चीनसोबत युद्ध झाल्यास पाकिस्तान घेईल गैरफायदा, लष्करप्रमुख बिपीन रावत यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2017 09:46 PM2017-09-06T21:46:03+5:302017-09-06T21:50:21+5:30
नवी दिल्ली, दि. ६ - भारत आणि चीनमध्ये सुमारे दोन महिने चाललेला डोकलाम विवाद थांबून आता परिस्थिती सर्वसामान्य बनू लागली आहे. मात्र असे असले तरी लष्कराने दोन आघाड्यांवर लढण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे. उत्तरेकडील सीमेवर संघर्ष उदभवल्यास पश्चिमेकडील शत्रू देश त्याचा गैरफायदा उठवू शकतो, असे होण्याची शक्यता अधिक आहे, असा सावधगिरीचा इशारा लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी दिला आहे.
राजधानी नवी दिल्लीत आयोजित भविष्यातील युद्ध या कार्यक्रमात बोलताना लष्करप्रमुखांनी हे वक्तव्य केले आहे. यावेळी भारत हा दोन विरोधी देशांनी घेरलेला आहे, असे त्यांनी सांगितले. रावत म्हणाले, सीमेवर भारताचे दोन शत्रू आहेत. त्यातील उत्तर सीमेवरील देश म्हणजे चीन आणि पश्चिम सीमेवरील देश म्हणजे पाकिस्तान. त्यातील पश्चिम सीमेवरील शत्रूचा विचार केल्यास आम्हाला त्याच्यासोबत कुठल्याही वाटाघाटींची शक्यता वाटत नाही. कारण भारत त्यांची फाळणी करू पाहतोय, असे तेथील राजकारणी, जनता आणि सैन्याला पढवण्यात आले आहे. त्यांनी आपल्यासोबत छद्म युद्ध पुकारलेले आहे. आता आपला देश कधीपर्यंत हे सर्व सहन करेल आणि कधी सहनशक्तीचा अंत होऊन युद्धाला तोंड फुटेल याबाबत काही सांगता येत नाही." त्याबरोबरच उत्तर सीमेवरही युद्धजन्य परिस्थितीसाठी आपल्याला तयार राहिले पाहिजे, असेही ते पुढे म्हणाले.
याआधी भारतीय लष्कर अडीच आघाड्यांवर लढण्यासाठी सज्ज असल्याचे वक्तव्य रावत यांनी केले होते. चीन आणि पाकिस्तानकडून असलेले बाह्य धोके आणि देशांतर्गत सुरक्षितता अबाधित राखणे अशा सर्व आघाड्यांवर एकाच वेळी लढण्यास भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज असल्याची ग्वाही लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी दिली होती. एका वृत्तसंस्थेशी बोलताना जनरल रावत यांनी या सज्जतेस ‘अडीच आघाड्यांची सज्जता’ असे संबोधले होते. मात्र लष्कराची ही सिद्धता कोणताही ठराविक देश डोळ्यांपुढे ठेवून नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.
जनरल रावत म्हणाले की, एकाच वेळी अनेक आघाड्यांचा मुकाबला करण्यास भारताची तयारी असली तरी प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडण्याचे (युद्धाखेरीज) इतरही परिणामकारक मार्ग उपलब्ध असतात. याच संदर्भात, गेल्या ४० वर्षांत भारत-चीन सीमेवर एकही गोळी झाडण्याची कधी वेळ आलेली नाही, या पंतप्रधानांच्या विधानाचा त्यांनी संदर्भ दिला होता..