पाकिस्तानी मौलवीने केली सेक्स रॅकेटमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2017 04:20 PM2017-08-15T16:20:23+5:302017-08-15T16:40:48+5:30
'मला किती वेळा विकलं, हेदेखील आता मला आठवत नाही'
नवी दिल्ली, दि. 15 - जेव्हा सबीना (बदललेलं नाव) 7 ऑगस्ट रोजी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचल्या तेव्हा सर्वात आधी आपल्या मुलाला मिठी मारुन अश्रूंना मार्ग मोकळा करुन दिला. सबीना यांच्या भावनिक होण्यामागची कहाणीही तितकीच भयानक आहे. अपहरण, ब्लॅकमेल आणि तस्करीमध्ये अडकलेल्या सबीनाच्या गोष्टीवरुन अनेक देशांमध्ये सुरु असलेलं सेक्स रॅकेट समोर आलं आहे.
मे महिन्यामध्ये सबीनाचा हा भयानक प्रवास सुरु झाला, जेव्हा तिच्या पहिल्या पतीची नातेवाईक मुन्नी चांगलं काम आणि पैसे मिळवून देण्याचं अमिष दाखवत मलेशियामधील क्वालालंपूर येथे घेऊन आली. मुन्नीने तिथे पोहोचल्यानंतर सबीनाला एका गृहस्थाला विकले. यानंतर त्या व्यक्तीने आपल्या मित्रासोबत मिळून सबीनावर बलात्कार केला. एका पाकिस्तानी मौलवीने मदत केली, तेव्हा कुठे सबिनाची या भयाण परिस्थितीतून सुटका झाली.
सबीना जेव्हा मलेशियाला चालली होती, तेव्हा मुन्नी आणि दोन महिला तिच्यासोबत होत्या. मुन्नीची बहिण मोहम्मदीदेखील तिच्यासोबत होती.
मलेशियामध्ये अडकलेल्या सबीनाच्या मदतीसाठी पाकिस्तानी नागरिक देवाप्रमाणे धावून आला. त्याने सबीनाचं सर्व म्हणणं ऐकून घेतलं, आणि त्यानंतर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी छापेमारी करत मुन्नी आणि मोहम्मदी दोघींना अटक केली आहे.
सबीनाची सुटका केल्यानंतर मिशनरीद्वारा चालवत येत असलेल्या एका निवा-यात तिला ठेवण्यात आलं. मात्र आपला मुलगा आणि पतीपासून लांब असल्याने तिला होणारा त्रास पाहून तेथील मुलांनी दिल्लीमधील मिशनरीसोबत संपर्क साधला. यानंतर शेवटी तिला भारतात आणण्यात आलं.
मुन्नीसोबत मलेशियाला का गेली ? असं विचारलं असता सबीनाने सांगितलं की, 'ती मला नेहमी माझे खासगी फोटो दाखवून चुकीची कामं करण्यास प्रवृत्त करत असे. एका पाकिस्तानी मौलवीसोबत माझी भेट झाली. त्यांनी माझी पुर्ण गोष्ट ऐकली, आणि मदत करण्याचा निर्णय घेतला. जर त्यांनी मदत केली नसती, तर आज मी अत्यंत वाईट परिस्थितीत जगत असते'. 'मला किती वेळा विकलं हेदेखील मला आठवत नाही', असं सबीना बोलल्या आहेत.