तुमची कंपनी पीएफ खात्यात योग्य प्रकारे पैसे भरत नसल्यास काय कराल?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 11:59 AM2018-08-21T11:59:43+5:302018-08-21T12:00:42+5:30
66 वर्षांपूर्वी एम्प्लॉइज प्रॉविडंट फंड ऑर्गनायजेशन म्हणजेच इपीएफओची निर्मिती करण्यात आली. कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा मिळावी आणि कर्मचाऱ्यांचे पैसे सुरक्षित राहावेत यासाठी ही योजना लागू करण्यात आली.
मुंबई- पगारदार लोकांसाठी भविष्य निर्वाह निधी हा सेव्हींगचा अत्यंत चांगला पर्याय मानला जातो. 66 वर्षांपूर्वी एम्प्लॉइज प्रॉविडंट फंड ऑर्गनायजेशन म्हणजेच इपीएफओची निर्मिती करण्यात आली. कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा मिळावी आणि कर्मचाऱ्यांचे पैसे सुरक्षित राहावेत यासाठी ही योजना लागू करण्यात आली. संघटित आणि असंघटीत अशा सर्व क्षेत्रांसाठी ती लागू करण्यात आली. काही कंपन्यांनी स्वतःचे प्रॉव्हिडंट फंडही तयार केलेले आहेत.
पगारदार लोकांसाठी करबचतीसाठीही इपीएफची मोठी मदत होते. या पैशांवर मिळालेले व्याज व परतावा यांच्यावर कोणताही कर लावला जात नाही. तसेच इपीएफमध्ये जमा केलेल्या पैशासाठी करनियम 80 सी खाली सूटही मिळते. मात्र स्वतःचे प्रॉव्हीडंट उंड चालवणाऱ्या 300 कंपन्यांनी नियमांचे उल्लंघन केले असून कर्मचाऱ्यांना योग्य व्याज देण्यात त्यांना यश आले नसल्याचे केंद्रीय श्रम मंत्रालयाने (लेबर मिनिस्ट्री) जाहीर केले आहे.
आपली कंपनी निधीमध्ये योग्यप्रकारे पैसे जमा करत आहे की नाही हे पाहाण्यासाठी तुम्ही काय कराल?
1) तुम्हाला मिळत असलेला पगार आणि त्यामध्ये कापून घेतले जाणारे पैसे हे दोन्ही आकडे नेहमी तपासत राहा.
तसेच तुमची सॅलरी स्लिप आणि पीएफ खाते यावरही लक्ष ठेवा, अधूनमधून ते पीएफ खाते तपासत राहा.
2) जर त्यामध्ये कोणतीही चूक किंवा गोंधळ दिसल्यास तात्काळ तुमच्या एचआर अथवा आर्थिक व्यवहार विभागाकडे जाऊन चौकशी करा.
3) जर या विभागात योग्य प्रकारे समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर कंपनीच्या व्यवस्थापनाकडे चौकशी करा किंवा पीएफ ट्रस्टकडे चौकशी करा.
4) येथेही तुमचे समाधान झाले नाही तर प्रादेशिक निर्वाह निधी आयुक्त किंवा मुख्य दक्षता अधिकाऱ्यांकडे तक्रार करा.
5) इपीएफओकडे ऑनलाइन तक्रार करण्याची सुविधाही देण्यात आलेली असते. ही तक्रार करण्यासाठी तुमच्याकडे युनिवर्सल अकाऊंट नंबर असणे आवश्यक आहे. ज्या कंपन्यांचे स्वतःचे प्रॉव्हिडंट ट्रस्ट आहेत त्यांच्यासाठीही हा नंबर असणे आवश्यक आहे. तुमच्या तक्रारीवर तोडगा मिळण्यासाठी 30 दिवसांचा अवधी लागेल.
6) शेवटचा पर्याय म्हणून तुम्ही पोलिसांकडे भारतीय दंडविधान संहितेच्या नियम 405अन्वये फसवणूकीची तक्रार दाखल करु शकता.