पहलाज निहलानी यांना सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदावरुन डच्चू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 07:20 PM2017-08-11T19:20:03+5:302017-08-11T20:07:16+5:30
नेहमी वादात असणारे पहलाज निहलानी यांना सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदावरुन हटवण्यात आलं आहे.
नवी दिल्ली, दि. 11 - नेहमी वादात असणारे पहलाज निहलानी यांना सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदावरुन हटवण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गीतकार प्रसून जोशी यांची त्यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे. अभिनेत्री विद्या बालनचीही सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. चित्रपटांवर आक्षेप घेत काट-छाट करायला लावत असल्याने अनेकदा पहलाज निहलानी वादात अडकले असून, अनेकांनी त्यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली होती. त्यांना अध्यक्षपदावरुन हटवण्यात यावं अशी मागणीही होत होती. अखेर शुक्रवारी त्यांना अध्यक्षपदावरुन हटवण्यात आलं असून प्रसून जोशी यांना त्यांच्या जागी आणलं आहे.
माहिती व प्रसारण मंत्रालय पहलाज निहलानी यांच्यावर कारवाई करेल असा अंदाज महिन्याच्या सुरुवातीला वर्तवण्यात आला होता. पहलाज निहलानी यांनी तीन वर्ष सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. या तीन वर्षातील त्यांची कारकीर्द अतिशय वादग्रस्त ठरली. त्याशिवाय त्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांवर टीकाही झाली होती.
जानेवारी 2015 मध्ये पहलाज निहलानी यांची सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. 23 सदस्यांच्या सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदी आल्यापासून पहलाज निहलानी वादात राहिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले 'अॅक्शन हिरो' असल्याचं सांगत त्यांनी स्तुतीसुमनं उधळली होती. पहलाज निहलानी यांना सेन्सॉर बोर्डाचा अध्यक्ष करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुढाकार घेतल्याचीही चर्चा होती. आरएसएसने वादग्रस्त राहिलेले एफटीआयआयचे अध्यक्ष गजेंद्र चौहाना यांनाही पाठिंबा दर्शवला होता.
मोदींचा चमचा असल्याचा अभिमान-
'उडता पंजाब' चित्रपटावेळी झालेल्या वादावेळी अनुराग कश्यपच्या आरोपांना उत्तर देताना मोदींचा चमचा असल्याचा अभिमान असल्याचं पहलाज निहलानी बोलले होते. 'अनुराग कश्यप यांनी मी मोदींचा चमचा असल्याचं बोलले आहेत, हो मी आहे चमचा, आणि मला याचा अभिमान आहे. मग मी काय इटलीच्या पंतप्रधानांचा चमचा असायला हवं होतं का ?', असा उलटा सवाल पहलाज निहलानी यांनी केला होता.