लंडनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून लोकसभा निवडणूक 2019 चे स्पष्ट संकेत, काय असणार भाजपाची रणनीती?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2018 10:01 AM2018-04-20T10:01:55+5:302018-04-20T11:47:31+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लंडनमधील वेस्टमिंस्टर सेंट्रल हॉलमध्ये आयोजित केलेल्या 'भारत की बात सबके साथ' या कार्यक्रमात लोकसभा निवडणूक 2019 साठी भाजपाची रणनीती कशी असणार, याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लंडनमधील वेस्टमिंस्टर सेंट्रल हॉलमध्ये आयोजित केलेल्या 'भारत की बात सबके साथ' या कार्यक्रमात लोकसभा निवडणूक 2019 साठी भाजपाची रणनीती कशी असणार, याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची प्रचारा मोहीम कशा प्रकारे असेल, याबाबतची माहिती त्यांनी स्पष्ट केली आहे. UPA सरकारच्या तुलनेत भाजपा सरकारनं देशाच्या विकासासंबंधी मोठी पाऊले उचलली आहेत, यासारखे मुद्दे मांडून भाजपा 2019 व त्या पुढील निवडणुकांच्या प्रचारादरम्यान काँग्रेसवर हल्लाबोल करताना दिसेल. भाजपा सरकारचा पाच वर्षांचा कार्यकाळ हा UPA सरकारच्या 10 वर्षांच्या कार्यकाळापेक्षा अधिक चांगला आहे आणि लोकांनी या गोष्टीसोबतच एनडीए सरकारची तुलना करायला हवी, असे मोदी म्हणालेत. यावरुन भ्रष्टाचार आणि खराब प्रशासन या मुद्यांवरुन काँग्रेसवर निशाणा साधणार असल्याचं मोदींच्या टीकेवरुन स्पष्ट होत होते.
यावेळी पंतप्रधान मोदींनी हेदेखील स्पष्ट केले की, पाकिस्तानातील दहशतवादासारख्या समस्यांकडे पाहण्याचा दृष्टीकोन अतिशय उद्देशपूर्ण असा आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये करण्यात आलेली सर्जिकल स्ट्राईक कारवाईबाबत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ''भारत बदलला आहे आणि पाकिस्तानची आगळीक खपवून घेतली जाणार नाही. सर्जिकल स्ट्राईकच्यानिमित्ताने आम्ही त्यांना समजेल अशा भाषेत प्रत्युत्तर दिले आहे''.
भारताकडून 29 सप्टेंबर 2016 रोजी करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानचे लष्करी अधिकारी माझ्याशी फोनवर बोलायलाही घाबरत होते, असा खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. सर्जिकल स्ट्राईकची माहिती सार्वजनिक करण्यापूर्वी आम्ही पाकिस्तानलाही याबद्दल कळवले होते. जेणेकरून या हल्ल्यात ठार झालेल्या त्यांच्या सैनिकांचे मृतदेह त्यांना परत नेता यावेत. त्यासाठी आम्ही सकाळी 11 च्या सुमारास पाकिस्तानमध्ये फोन केला. मात्र, तेव्हा पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांसह सर्वच अधिकारी प्रचंड घाबरले होते. त्यामुळे कोणीही माझ्याशी फोनवर बोलायला तयार नव्हते. अखेर दुपारी 12 च्या सुमारास आम्ही त्यांच्याशी बोललो व त्यानंतर ही माहिती सार्वजनिक केली, असे मोदींनी सांगताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.