...तर पीओके भारताचा भाग झाला असता !
By admin | Published: September 2, 2016 02:43 AM2016-09-02T02:43:00+5:302016-09-02T11:53:44+5:30
भारताने नैतिकतेऐवजी लष्करी पर्याय वापरला असता तर पाकव्याप्त काश्मीर भारताचा झाला असता, असे हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल अरूप
नवी दिल्ली : भारताने नैतिकतेऐवजी लष्करी पर्याय वापरला असता तर पाकव्याप्त काश्मीर भारताचा
झाला असता, असे हवाईदल
प्रमुख एअर चीफ मार्शल अरूप
राहा यांनी गुरुवारी येथे सूचित केले. अरूप राहा एअरोस्पेस चर्चासत्रात बोलत होते.
देशाच्या हवाई दलाचे सामर्थ्य १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात भारत सरकारकडून पूर्णपणे वापरले गेले नाही अशी हळहळही त्यांनी व्यक्त केली. अरूप राहा म्हणाले, पाकव्याप्त काश्मीर हा आमच्या शरीरात रुतलेला काटा आहे. भारताने सुरक्षेच्या गरजांकडे व्यावहारिक दृष्टीने बघितले नाही.
आमच्या संरक्षणाच्या गरजांबाबत आमच्यावर आदर्शांनी राज्य केले. त्यामुळे आम्ही व्यावहारिक भूमिका घेतली नाही. सौहार्दाचे वातावरण राखण्यासाठी लष्करी शक्तीकडे
दुर्लक्ष केले. भूतकाळात शत्रुंना अटकाव करताना लष्करी शक्ती विशेषत: हवाई दलाचे सामर्थ्य वापरण्यात भारत नाखुष होता, असे राहा म्हणाले.
अरूप राहा म्हणाले की, १९४७ मध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये टोळ््यांनी हल्ला केला त्यावेळी भारतीय हवाई दलाच्या वाहतूक विमानांनी भारतीय सैनिक आणि उपकरणे प्रत्यक्ष युद्धाच्या स्थळी पोहोचविण्यास मदत केली होती. आणि ज्यावेळी लष्करी उपाय
नजरेच्या टप्प्यात होता, तेव्हा
आपण नैतिकतेच्या गप्पा मारल्या. प्रश्न शांततेच्या मार्गांनी सुटावा
म्हणून आम्ही संयुक्त राष्ट्रांत धाव घेतली.
१९६२ मध्ये चकमक होईल या भीतीतून हवाई दलाचे सामर्थ्य पूर्णपणे वापरले गेले नसल्याचे राहा म्हणाले. १९६५ च्या युद्धात पाकिस्तानचे हवाई दल आमचे हवाईतळ, पायाभूत सुविधा, जमिनीवर असलेल्या विमानांवर पूर्व पाकिस्तानकडून हल्ले करीत असतानाही आम्ही राजकीय कारणांमुळे हवाई दलाचा वापर केला नाही.
आम्हाला गंभीर स्वरुपाची माघार घ्यावी लागली परंतु आम्ही कधीही प्रत्युत्तर दिले नाही. फक्त १९७१ च्या युद्धातच हवाई दलाची शक्ती पूर्णपणे वापरण्यात आली. तिन्ही दलांनी एकजीव होऊन काम केले व त्याचा परिणाम म्हणून बांगलादेशची स्थापना झाली, असे त्यांनी नमूद केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
संपूर्ण काश्मीर भारताचेच
पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र संघास कितीही पत्रे लिहिली तरी संपूर्ण जम्मू आणि काश्मीर भारताचेच आहे व त्याचा काही भाग पाकिस्तानने बेकायदेशीरपणे बळकावला आहे, ही वस्तुस्थिती बदलत नाही, असे भारताने गुरुवारी ठामपणे सांगितले.
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी काश्मीरसंबंधी संयुक्त राष्ट्र संघाच्या सरचिटणीसांना एका आठवड्यात दुसरे पत्र पाठविले. त्यावर प्रतिक्रिया देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप म्हणाले की, त्यांना अशी हवी तेवढी पत्रे लिहू देत, त्याने संपूर्ण जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे ही वस्तुस्थिती बदलणार नाही.