रायन इंटरनॅशनल स्कूल उघडल्यानंतर प्रद्युम्नच्या वर्गात पहिल्या दिवशी फक्त चार मुलं हजर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2017 01:59 PM2017-09-18T13:59:46+5:302017-09-18T14:20:02+5:30
शाळा प्रशासनाकडून शाळा पुन्हा उघडण्यात तर आली, पण आज शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या एकदम तुरळक दिसली.
गुरगाव, दि. 18- गुरूग्राममधील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या प्रद्युम्न ठाकूर या सात वर्षाच्या मुलाच्या हत्येला आज दहा दिवस झाले. प्रद्युम्नच्या हत्येनंतर रायन इंटरनॅशनल स्कूल बंद ठेवण्यात आली होती. आज तब्बल दहा दिवसांनी शाळा पुन्हा उघडली. शाळा प्रशासनाकडून शाळा पुन्हा उघडण्यात तर आली, पण आज शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या एकदम तुरळक दिसली. सगळ्यात धक्कादायक म्हणजे प्रद्युम्नच्या वर्गात फक्त चारच विद्यार्थी हजर होते. या चारपैकी दोन मुलं त्यांच्या पालकांना घेऊन शाळेतून नाव काढून घेण्यासाठी आले होते. 8 सप्टेंबर रोजी गुरूग्राममधील रायन इंटरनॅशनल स्कूलच्या स्वच्छतागृहात प्रद्युम्नचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडला होता. प्रद्युम्नच्या हत्येप्रकरणी शाळेच्या बसचा ड्रायव्हर अशोक कुमार याला अटक करण्यात आली होती.
प्रद्युम्नची हत्या झाल्यानंतर आज दहा दिवसांनी शाळा सुरू झाली. सोमवारी सकाळी शाळा सुरू झाल्यापासून सकाळपासूनच विद्यार्थ्यांची संख्या शाळेत कमी दिसली. मुलांना घेऊन शाळेत आलेल्या प्रत्येक पालकांना त्यांच्या मुलाच्या अभ्यासाची चिंता होती पण त्याचवेळी शाळेतील त्यांच्या सुरक्षेविषयी भीतीही वाटत होती.
'प्रद्युम्नच्या हत्येनंतर माझ्या मुलाला मानसिक धक्का बसला. त्यामुळे त्या वर्गात आणि जेथे प्रद्युम्नचा मृतदेह सापडला त्या स्वच्छतागृहात परत जाण्याच्या तो तयारीत नसल्याचं प्रद्युम्नच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या पालकांनी सांगितलं. तसंच शाळेतील सुरक्षा व्यवस्थेवर विश्वास नसल्याने आम्ही मुलांना शाळेत पाठवणार नाही, असं मतही काही पालकांनी व्यक्त केलं.
मुलांमध्ये भीतीचं वातावरण
रायन इंटरनॅशनल स्कूल सोमवारी सकाळी सुरू झाली. मुलांनी शाळेत हजेरी लावली. पण शाळेत आलेल्या मुलांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळतं आहे. शाळेत आल्यानंतर खूप भीती वाटते आहे. पण शाळा पुन्हा सुरू झाली म्हणून यावं लागलं,अशी प्रतिक्रिया मुलांकडून मिळते आहे. मुलांच्या अभ्यासाचं नुकसान होऊ नये, यासाठी त्यांना शाळेत घेऊन आल्याचं पालकांनी सांगितलं आहे. सकाळी शाळेमध्ये आलेली एक मुलगी रडायला लागली आणि भीतीमुळे ती वर्गात बसायला तयार नव्हती. यामुळे तिचे पालक तिला पुन्हा घरी घेऊन गेले. तर काही पालकांनी आज मुलांना शाळेत न पाठवणं पसंत केलं. शाळेतील सुरक्षा व्यवस्था नीट असल्याची खात्री करूनच मुलांना शाळेत पाठवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तर शाळेत गेलेली आमची मुलं पुन्हा घरी येईपर्यंत मनात भीतीचं असेल, असं काही पालकांनी सांगितलं.
प्रद्युम्नच्या वडिलांनी व्यक्त केली नाराजी
प्रद्युम्नच्या हत्येनंतर दहा दिवसांनी शाळा सुरू केल्याच्या निर्णयावर प्रद्युम्नच्या वडिलांनी नाराजी व्यक्त करत निर्णयाला विरोध केला आहे. जोपर्यंत हत्येचा तपास पूर्ण होत नाही. तोपर्यंत शाळा प्रशासन शाळा कशी सुरू करू शकतं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. याप्रकरणी वरूण ठाकूर म्हणाले, या संपूर्ण घटनेत शाळेतील काही लोक सहभागी आहेत. जर शाळा पुन्हा सुरू केली तर ती लोक पुराव्यांशी छेडछाड करण्याची शक्यता आहे.
कोर्टाने सरकारला पाठवली नोटीस
सुप्रीम कोर्टाने शाळेतील सुरक्षेच्या मुद्द्यावर केद्र सरकार आणि राज्य सरकारकडून उत्तर मागितलं आहे. कोर्टाने नोटीस जारी करत, शाळांमध्ये सुरक्षेच्या मुद्द्यावर काय पाऊलं उचलली जात आहेत? असा सवाल विचारला आहे. केंद्र आणि राज्य सरकारने तीन आठवड्यात यावर उत्तर देण्याचंही सुप्रीम कोर्टाने म्हंटलं आहे. गुरूग्रामच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रद्युम्नची हत्या झाल्यानंतर शाळांमधील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
नेमकं प्रकरण काय ?
गुरूग्रामच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये 8 सप्टेंबर रोजी दुसरीत शिकणाऱ्या प्रद्युम्नची हत्या झाली. शाळेच्या स्वच्छतागृहात रक्ताच्या थारोळ्यात प्रद्युम्नचा मृतदेह सापडला होता. याप्रकरणी शाळेच्या बसचा कंडक्टर अशोक याच्यासह तीन जणांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांकडून झालेल्या तपासणीत आरोपी अशोक कुमार याने गुन्ह्याची कबूली दिली.