महामस्तकाभिषेक सोहळ्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 12:08 AM2018-02-04T00:08:36+5:302018-02-04T00:16:39+5:30
श्रवणबेळगोळ येथील भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक महोत्सवाची तयारी जोराने सुरू आहे. येत्या ७ फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत महोत्सवाला सुरुवात होत आहे.
सांगली : श्रवणबेळगोळ येथील भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक महोत्सवाची तयारी जोराने सुरू आहे. येत्या ७ फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत महोत्सवाला सुरुवात होत आहे.
श्रवणबेळगोळ येथे दर बारा वर्षांनी भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक सोहळा होत असतो. यंदा ७ ते २५ फेब्रुवारीदरम्यान या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. त्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून तयारी सुरू आहे. ७ फेब्रुवारी रोजी सकाळी पावणेअकरा वाजता राष्ट्रपती कोविंद श्रवणबेळगोळ येथे येणार आहेत. त्यानंतर तासभर ते महोत्सवात सहभागी होतील, असे संयोजकांतर्फे सांगण्यात आले.
सांगली, कोल्हापूर, बेळगाव, चिक्कोडी, बोरगाव, बेडकीहाळ या परिसरातून शेकडो टन धान्य व इतर साहित्य आहारासाठी पाठविण्यात आले. सांगलीच्या मार्केट यार्डातून ८० टन धान्य रवाना झाले. यात बेदाणा, मिरची पावडर, खपली गहू, तांदूळ, डाळी, तेलाचा समावेश आहे. सन्मती संस्कार मंचानेही\ गावागावातून तीन टन धान्य जमा करुन पाठवले.
श्रवणबेळगोळ येथे आहार साहित्याचे स्वागत करण्यात आले. यावेळी स्वतिश्री चारुकीर्ती भट्टारक महास्वामी, महोत्सव समितीचे राष्ट्रीय सचिव सुरेश पाटील, भोजन विभागाचे प्रमुख विनोद बाकलीवाल उपस्थित होते. दोन दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. श्रवणबेळगोळ येथील सर्व जैन मंदिरांमध्ये जैन तिर्थंकरांच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आले. शनिवारी गुरूपूजा करण्यात आली. रविवारी भगवान आदिनाथ पंचकल्याण महोत्सवांतर्गत यक्ष-यक्षी, षोडशोपचार पूजा होणार आहे.
- सन्मती संस्कार मंचच्या ५०० हून अधिक स्वयंसेवकांनी या मोहिमेत भाग घेतला आहे. चार ते पाच दिवस ही मोहीम सुरू राहणार आहे. वीर महिला मंडळाच्या २५०० भगिनीही नियोजनात सहभागी आहेत.