सोन्याच्या बांगड्या विकून मुख्याध्यापिकेने केली शहीद जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 12:24 PM2019-02-22T12:24:21+5:302019-02-22T13:03:57+5:30
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. या घटनेनंतर शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी देशभरातून अनेक हात पुढे येत आहेत.
श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. या घटनेनंतर शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी देशभरातून अनेक हात पुढे येत आहेत. प्रत्येकजण आपापल्या परिने शहिदांच्या कुटुंबीयांना मदत करत आहेत. उत्तर प्रदेशमधील बरेली येथील एका खासगी शाळेतील मुख्याध्यापिकेनंही आपल्या सोन्याच्या बांगड्या विकून शहिदांच्या कुटुंबीयांना मदत केली. एक लाख रुपयांची आर्थिक मदत त्यांनी केली आहे.
किरण कोटनाला असे या मुख्याध्यापिकेचे नाव आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या 40 जवानांच्या कुटुंबीयांना मदतीचा हातभार लावण्यासाठी त्यांनी 1,38,387 रुपये पंतप्रधान मदत निधीमध्ये जमा केले आहेत.
किरण कोटनाला यांनी सांगितले की, पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर शहिदांचे पार्थिव जेव्हा त्यांच्या नातेवाईकांकडे पोहोचले. त्यावेळेस शहीद जवानांच्या पत्नींना रडताना पाहून खूप दुःख झाले. त्यांच्या भावना, अवस्था पाहून आपण या महिलांना कोणत्या पद्धतीनं मदत करू शकतो?, या प्रश्नानं पछाडलं. अखेर त्यांनी आपल्याकडील सोने विकून शहिदांच्या कुटुंबीयांना मदत करण्याचा निर्णय घेतला. सोन्याच्या बांगड्या विकून त्यातून मिळालेली रक्कम पंतप्रधान मदत निधीमध्ये जमा केली.
सोन्याच्या बांगड्या वडिलांनी दिल्या होत्या
किरण कोटनाला यांनी सांगितले की, आपल्या देशातील प्रत्येक कुटुंबानं एक रूपयाची जरी मदत केली, तरीही शहिदांच्या कुटुंबीयांना मोठी मदत होईल. त्यांनी पुढे असंही सांगितले की, ज्या सोन्याच्या बांगड्या विकून त्यांनी शहीद जवानांच्या परिवाराला मदत केली, त्या बांगड्या वडिलांनी मला भेट म्हणून दिल्या होत्या.
Kiran Jhagwal,a pvt school Principal in Bareilly,sold her bangles&donated Rs 1,38,387 in Prime Minister's Relief Fund for families of CRPF jawans who lost their lives in #PulwamaAttack. She says, "When I saw their wives crying on TV,I thought what's the use of my bangles?" (21.2) pic.twitter.com/OYOOjuFASl
— ANI UP (@ANINewsUP) February 21, 2019