'पुलवामा हल्ल्यामागे नरेंद्र मोदी - इम्रान खान यांची फिक्सिंग'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 07:33 PM2019-03-07T19:33:24+5:302019-03-07T19:36:43+5:30
जम्मू-काश्मीरमधील पुलावामा दहशतवादी हल्ला हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी फिक्स केला होता, असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे नेते बी. के. हरिप्रसाद यांनी केला आहे.
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पुलावामा दहशतवादी हल्ला हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी फिक्स केला होता, असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे नेते बी. के. हरिप्रसाद यांनी केला आहे.
जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये 14 फेब्रुवारीला 'जैश-ए-मोहम्मद'च्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. या कारवाईत भारतीय हवाई दलाने बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या तळांवर ‘मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी 1000 किलोचे बॉम्ब फेकले. यात जवळपास 300 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, भारतीय हवाई दलाने केलेल्या या कारवाईवर अनेक शंका उपस्थित करुन यावर राजकारण करण्यात येत आहे. तसेच, या कारवाईचे पुरावे केंद्र सरकारकडे मागितले जात आहेत. याशिवाय, यावरुन केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर विरोधकांकडून आरोप करण्यात येत आहेत. यात काँग्रेसचे नेते बी. के. हरिप्रसाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. ते म्हणाले, 'पुलवामा हल्ल्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यात फिक्सिंग आहे. हा हल्ला हातमिळवणी शिवाय शक्य नाही. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खुलासा द्यायला पाहिजे.'