Pulwama Attack : एसबीआयकडून 23 शहीद सीआरपीएफ जवानांचे कर्ज माफ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 10:32 AM2019-02-19T10:32:07+5:302019-02-19T10:32:53+5:30
प्रत्येक जवानाला बँकेकडून 30 लाखांचा अपघाती विमा दिला जातो.
नवी दिल्ली : देशाची सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने 14 फेब्रुवारीला पुलवामामध्ये आत्मघाती हल्ल्यात शहीद झालेल्यांपैकी 23 जवानांचे कर्ज माफ केले आहे. या हल्ल्यात 40 सीआरपीएफ जवान शहीद झाले होते.
स्टेट बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे की, सीआरपीएफच्या शहीद झालेल्या जवानांपैकी 23 जवानांना स्टेट बँकेने कर्ज दिले होते. या जवानांचे कर्ज तात्काळ माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीआरपीएफचे सर्व जवान संरक्षण वेतन पॅकेजद्वारे बँकेचे ग्राहक आहेत. यामुळे प्रत्येक जवानाला बँकेकडून 30 लाखांचा अपघाती विमा दिला जातो.
बँकेनुसार शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी विम्याची रक्कम तातडीने देण्यात यावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी सांगितले की, नेहमी देशाच्या सुरक्षेसाठी उन, वाऱ्याची पर्वा न करता सीमेवर पहारा देणाऱ्या जवानांना दहशतवादी हल्ल्यात मरण येणे दु:खदायक आहे. एसबीआयने या कुटुंबांना मदत करण्यासाठी एक पाऊल उचलले आहे. बँकेने भारतमातेच्या या वीरांसाठी युपीआय बनविला आहे. ज्याद्वारे लोक मदत करू शकतात.
अक्षय कुमारसह अनेकजण मदतीसाठी सरसावले
अक्षयने शहिदांच्या कुटुंबियांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी अॅप आणि वेबसाईटची मदत घेण्याचे आवाहन केलं आहे. पीपिंगमूनला मिळालेल्या माहितीनुसार अक्षयने केवळ दिड दिवसात सात कोटी रुपये जमवले आहेत. खुद्द अक्षयने या फंडमध्ये पाच कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. अक्षयने ज्या वेबसाईट आणि अॅपच्या माध्यमातून ही मदत केली आहे. त्याचे नाव आहे भारत के वीर. या अॅपची सुरुवात अक्षयने २०१७मध्ये केली होती. या द्वारे अक्षयने 7 कोटींची मदत जाहीर केली आहे.
त्यावेळी अक्षय म्हणाला होता की तो सरकारच्या मदतीने जवान आणि त्यांच्या कुटुंबियासाठी आर्थिक मदतीचं करण्यास कटिबद्धा आहे. त्यातूनच वीर अॅपचा जन्म झाला होता. या अॅपमध्ये स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या सहाय्याने कोणतंही ट्रान्सफर शुल्क न आकारता पैसे शहिदांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचवणं शक्य होणार आहे. पीपिंगमूनदेखील वाचकांना अपील करत आहे की, पुलवामामध्ये शहिद झालेल्या जवानांच्या परिवारांसाठी जास्तीत जास्त पुढे येऊन मदत करावी.
तर अमिताभ बच्चन यांनी 2.5 कोटी, शिर्डी संस्थानानेही मदत जाहीर केली होती. तसेच क्रिकेटपटूंसह अनेक खेळाडूंनीही शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली होती.