"२४ तासांत जाहीर माफी मागा", भाजपा उमेदवाराकडून शशी थरूरांना मानहानीची नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 02:16 PM2024-04-10T14:16:05+5:302024-04-10T14:20:20+5:30
Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडुकीच्या प्रचारादरम्यान शशी थरूर यांनी राजीव चंद्रशेखर यांच्याबाबत विधान केले होते.
Rajeev Chandrasekhar Defamation Notice: लोकसभा निवडणुकीची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहेत. प्रचाराचा धुरळा उडत आहे. यादरम्यान, केरळमधील तिरुवनंतपुरममधील भाजपाचे उमेदवार राजीव चंद्रशेखर यांनी काँग्रेसचे उमेदवार शशी थरूर यांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. लोकसभेचा गैरफायदा घेण्यासाठी खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवून आपली प्रतिमा डागाळल्याचा आरोप राजीव चंद्रशेखर यांनी केला आहे. दरम्यान, लोकसभा निवडुकीच्या प्रचारादरम्यान शशी थरूर यांनी राजीव चंद्रशेखर यांच्याबाबत विधान केले होते.
शशी थरूर यांनी राजीव चंद्रशेखर यांच्यावर मतदारांना पैसे वाटण्याचा आणि ख्रिश्चन समुदायामध्ये खोटे पसरवल्याचा आरोप केला होता. त्यामुळे राजीव चंद्रशेखर यांनी मानहानीची नोटीस पाठवली आहे. यासोबतच शशी थरूर यांनी आपल्यावर केलेले आरोप मागे घ्यावेत आणि त्याबद्दल जाहीर माफी मागावी, यासाठी राजीव चंद्रशेखर यांनी २४ तासांचा अवधी त्यांना दिला आहे.
शशी थरूर यांनी एका मुलाखतीत राजीव चंद्रशेखर यांच्यावर केलेले आरोप बिनबुडाचे आणि खोटे आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांची प्रतिमा डागाळण्याच्या उद्देशाने हे आरोप करण्यात आले आहेत. शशी थरूर यांनी यासाठी बिनशर्त जाहीर माफी मागावी आणि आपली विधाने मागे घ्यावीत. भविष्यात अशी खोटी विधाने करणे आणि अफवा पसरवणे थांबवावे, असे नोटीसमध्ये म्हटले आहे.
काय आहे प्रकरण?
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेस नेते शशी थरूर यांनी केरळमधील एका स्थानिक वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. त्यावेळी शशी थरूर यांनी राजीव चंद्रशेखर यांच्यावर मतदारांना पैसे वाटण्याचा आणि ख्रिश्चन समुदायाविरोधात खोटे पसरवल्याचा आरोप केला होता. मुलाखतीचा हा भाग सहा एप्रिल रोजी प्रसारित झाला होता. ते म्हणाले होते, "राजीव चंद्रशेखर यांनी एका विशिष्ट समुदायाच्या धार्मिक नेत्यांना पैसे देऊ केले आहेत." यावर प्रतिक्रिया देताना राजीव चंद्रशेखर म्हणाले की, हे विधान पूर्णपणे चुकीचे आहे.