Ram Mandir : शेकडो मुस्लिमांनी सोडली अयोध्या; विहिंप आणि शिवसेनेच्या कार्यक्रमांमुळे तणाव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 12:30 PM2018-11-24T12:30:02+5:302018-11-24T13:14:24+5:30
Ram Mandir : अयोध्येत रविवारी (25 नोव्हेंबर) विश्व हिंदू परिषदेची धर्मसंसद आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर परिसरातील मुस्लिम नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अयोध्या - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काही हजार शिवसैनिकांसह रविवारी (25 नोव्हेंबर)अयोध्या दौरा करणार आहेत. याचदिवशी विश्व हिंदू परिषदेच्या धर्मसंसदेमुळे धडक कृती दल (आरएएफ) आणि दहशतवादविरोधी पथकं अयोध्येत तैनात करुन सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे. दुसरीकडे, विश्व हिंदू परिषदेची धर्मसंसद आणि शिवसेनेच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर परिसरातील मुस्लिम नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येथे प्रचंड तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्यानं लोकांनी घरामध्ये अन्नधान्य भरण्यास सुरुवात केली आहे. अयोध्येत डिसेंबर 1992 मध्ये मशीद पाडल्यानंतर देशभर जे प्रकार घडते, त्यामुळे स्थानिक लोक चिंतित आहेत. असे काही घडू नये, अशीच त्यांची इच्छा आहे.
राम मंदिर उभे राहिलेले नाही ते झोपून राहिलेल्या कुंभकर्णांमुळे, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला https://t.co/bcAxS6By6W@uddhavthackeray@narendramodi#RamTemple#RamMandir
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) November 24, 2018
नॅशनल हेराल्डच्या वृत्तानुसार, भीतीपोटी जवळपास 3,500 मुस्लिमांनी शहर सोडून सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे. दरम्यान, पोलीस प्रशासनाकडून 24-25 नोव्हेंबरच्या राजकीय कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
फैजाबादचे पोलीस अधीक्षक अनिल कुमार सिंह यांनी आश्वासन दिले आहे की, मुस्लिम नागरिकांना पूर्णतः सुरक्षा पुरवण्यात येईल. कोणीही घाबरुन जाण्याचे कारण नाही. यादरम्यान, अयोध्येत धर्म संसदेची जोरदार तयारी सुरू आहे. विहिंपचे 1 लाखहून अधिक कार्यकर्ते कार्यक्रमासाठी हजर राहतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
Video : अयोध्या-काशी सोडा, जामा मस्जिद तोडा https://t.co/lmZXUkPpPm#SakshiMaharaj#RamMandir :
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) November 24, 2018
मुस्लिम कुटुंबांचे स्थलांतर
25 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांची अयोध्येत रॅली निघणार आहे. शिवाय, याच दिवशीच विश्व हिंदू परिषदेने धर्मसंसदेचे आयोजन केले आहे. यामुळे तिथे प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारनं अयोध्या आणि परिसरात जमावबंदी लागू केली आहे. परिसरात जमावबंदी लागू करण्यात आलेली असतानाही विश्व हिंदू परिषदेनं मोठा रोड शो केला आणि याद्वारे रविवारी होणाऱ्या धर्मसंसदेला आपला पाठिंबा जाहीर केला.
-विहिंपने अयोध्येच्या मुस्लीम वस्त्यांमधून रोड शो केला. त्यावेळी तिथे बाका प्रसंग उद्भवू नये म्हणून बंदोबस्त पाळण्यात आला.
- अनुचित प्रकार घडण्याच्या भयानं काही मुस्लिम कुटुंबे आपली घरेदारे तात्पुरती सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रयाला गेली आहेत, असे नगरसेवक हाजी असद यांनी सांगितले.
शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्याची मनसेने उडवली खिल्ली, शिवसेना भवनासमोर झळकले पोस्टर https://t.co/VqMIWd6FBo#ShivSena#MNS
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) November 24, 2018
कडेकोट सुरक्षा व्यवस्था
पोलीस प्रशासनाकडून देण्यता आलेल्या माहितीनुसार, अयोध्येत कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी एक अतिरिक्त पोलीस महासंचालक स्तराचे अधिकारी एक उप-पोलीस महानिरीक्षक, तीन वरिष्ठ पोलीस अधीक्षक, 10 अपर पोलीस अधीक्षक, 21 क्षेत्राधिकारी, 160 पोलीस अधिकारी, 70 हवालदार, पीएसीच्या 42 आणि आरएएफच्या 5 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त एटीएसचे कंमाडो आणि ड्रोन कॅमेऱ्यानंही नजर ठेवण्यात येणार आहे.