बाबा राम रहीमची 'सीक्रेट' गुफा, येथेच बलात्कार केल्याचा आहे आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2017 12:48 PM2017-08-25T12:48:35+5:302017-08-25T12:55:08+5:30
गुफेमध्ये प्रवेश करण्यासाठी दोन-तीन दरवाजे आहेत. बाबाची गाडी थेट या दरवाजांपर्यंत पोहोचते. गुफेत प्रवेश करताना बायोमेट्रिक सिस्टिमचा वापर केला जातो.
नवी दिल्ली, दि. 25- डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहीमविरोधातील साध्वी बलात्कारप्रकरणी विशेष सीबीआय कोर्ट आज निकाल देणार आहे.800 गाड्यांच्या ताफ्यासह राम रहीम पंचकूला न्यायालयासाठी रवाना झाले आहेत.
राम रहीमवर आरोप करणा-या बलात्कार पीडितेने तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना पत्रं लिहिलं होतं. या पत्रात बाबाने रात्री गुफेमध्ये बोलावून दुष्कर्म केल्याचं तिने म्हटलं होतं. 'आज तक'ने दिलेल्या वृत्तानुसार, जवळपास 100 एकर परिसरात पसरलेल्या गुरमीत राम रहीम यांच्या आश्रमाच्या मधोमध काचेचं एक भवन आहे, त्याला बाबाची गुफा असं म्हटलं जातं.
गुफेमध्ये प्रवेश करण्यासाठी दोन-तीन दरवाजे आहेत. बाबाची गाडी थेट या दरवाजांपर्यंत पोहोचते. गुफेत प्रवेश करताना बायोमेट्रिक सिस्टिमचा वापर केला जातो. गुफेच्या रस्त्यात बंदुक घेऊन काही लोक तैनात असतात. बाबाच्या हजारो महिला भाविकांपैकी काही खास भाविकांनाच या गुफेत प्रवेश करण्याचा अधिकार आहे. या महिला भाविक साध्वीसारख्या वेशभूषेत असतात. बाबाला जेवण भरवण्यापासून सकाळ-संध्याकाळ स्टेजवर नेण्या-आणण्याचं काम या महिला भाविक करतात. बाबाच्या प्रवचनाच्या वेळीही या महिला भाविकांना बसण्याची विशेष सोय असते. प्रवचन हॉलमधील सर्व व्यवस्था या महिला भाविकच सांभाळतात तर हॉलच्या बाहेरील भागात पुरूष कारसेवक काम करतात.
बाबाच्या या गुफेत विशेष व्यक्तींची भेट घेण्यासाठी एक रूम आहे. अनेक देशांमध्ये थेट बोलता यावं यासाठी याच रूममध्ये हॉटलाइन उपलब्ध आहे. या गुफेत ऐशोआरामाची प्रत्येक वस्तू आहे. बाबाच्या आश्रमात सीसीटीव्ही तर आहेच शिवाय एक कंट्रोल रूम आहे. या रूममध्ये देशातील सर्व चॅनलची मॉनेटरिंग आणि बाबाशी संबंधित बातम्या रेकॉर्ड करण्याची सिस्टीमही आहे.
जाणून घेऊ राम रहीमविषयी-
गुरुमीत राम रहीम यांच्यावर बलात्कारापासून खुनाचे व खुनाच्या प्रयत्नाचे आरोप आहेत. त्यांनी आपल्या ४00 पुरुष अनुयायांची जबरदस्तीने नसबंदी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आश्रमातील साध्वीसंदर्भात अनुयायांना लैंगिक आकर्षण वाटू नये, यासाठी तसे केले होते, असे सांगण्यात येते. डेरा सच्चा सौदा पंथाच्या बेकायदा कामाविषयी वृत्तपत्रात लिखाण करणा-या पत्रकाराची हत्या त्यांच्याच सांगण्यावरून झाली होती, असे बोलले जाते. शीख समाजाचे गुरू गोविंद सिंह यांच्यासारखी वेशभूषा राम रहीम यांनी केल्याने त्या समाजाने संताप व्यक्त केला होता.
शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण : राम रहीम यांच्यावरील चित्रपटातील बराच भाग आक्षेपार्ह असल्याने त्यास संमती देण्यास सेन्सॉर बोर्डाच्या तत्कालीन अध्यक्ष लीला सॅमसन यांनी २0१५ साली नकार दिला होता. त्या चित्रपटास संमती द्यावी, यासाठी केंद्र सरकार आपल्यावर दबाव आणत आहे, अशी तक्रारही श्रीमती सॅमसन यांनी केली होती. राम रहीम यांच्या आश्रमात शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण दिले जात असल्याच्या तक्रारीनंतर हरयाणा उच्च न्यायालयाने त्याची नियमित तपासणी करावी, असे आदेश दिले होते.
कोण आहे बाबा गुरमीत राम रहीम-
15 ऑगस्ट 1967 रोजी बाबा गुरमीत राम रहीम यांचा जन्म झाला. राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यातील गुरुसर मोदिया येथे एका शीख कुटुंबात ते जन्माला आले. वयाच्या सातव्या 31 मार्च, 1974 रोजी तत्कालीन डेरा प्रमुख शाह सतनाम सिंह यांनी राम रहीम असं त्यांचं नाव ठेवलं. 23 सितंबर, 1990 रोजी शाह सतनाम सिंह यांनी देशभरातील अनुयायांचं सत्संग बोलावलं आणि गुरमीत राम रहीम सिंह यांना आपला उत्तराधिकारी घोषीत केलं. राम रहीम यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांनी दोन मुलींशिवाय हनीप्रीत हिला दत्तक घेतलं आहे.