रवि जाधव यांचा 'न्यूड' सिनेमा इफ्फीतून वगळला, सिनेमाच्या नावावर केंद्र सरकारला आक्षेप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2017 03:48 PM2017-11-11T15:48:44+5:302017-11-11T16:03:21+5:30
रवि जाधव दिग्दर्शित 'न्यूड' या सिनेमाला 48 व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमधून (इफ्फी) वगळण्यात आलं आहेे.
मुंबई- रवि जाधव दिग्दर्शित 'न्यूड' या सिनेमाला 48 व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमधून (इफ्फी) वगळण्यात आलं आहे. तेरा ज्युरी मेबर्सनी एकुण 24 सिनेमांची इंडियन पॅनोरमा विभागासाठी निवड केली होती. पॅनारोम विभागात न्यूड सिनेमाचं स्क्रीनिंग होणार होतं. पण माहिती व प्रसारण मंत्रालयाने जारी केलेल्या यादीतून या सिनेमाला वगळण्यात आलं आहे. सिनेमाच्या नावावर आक्षेप घेत या सिनेमाला यादीतून वगळल्याची माहिती मिळते आहे.
ज्युरी मेंबर्सचा सल्ला न घेता हा मोठा बदल करण्यात आला आहे. ज्युरीपैकी एक असणाऱ्या अपूर्वा असराणी यांनी केंद्राच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. कालपर्यंत मला सिनेमा यादीतून वगळल्याची माहिती नव्हती. फेडरेशनकडे मी यासंदर्भात लेखी नाराजी व्यक्त केली आहे, असं अपूर्वा असणारी यांनी म्हंटलं आहे. या सिनेमातून महिलेला अत्यंत सन्मानाची आणि आदराची वागणूक दिली गेली आहे. त्यामुळे मंत्रालय त्यांच्या निर्णयावर फेरविचार करून ज्युरीचा निर्णय कायम ठेवेल, अशी आशा असल्याचं अपूर्वा असराणी यांनी म्हंटलं आहे. इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
दिग्दर्शक रवि जाधव यांचा 'न्यूड' हा सिनेमा न्यूड मॉडेल म्हणून काम करणाऱ्या एका तरूण स्त्रीच्या जीवनावर आधारीत आहे. सिनेमाची इफ्फीतील स्क्रीनिंगसाठी निवड झाल्याचं वाटलं होतं. पण सकाळी वृत्तपत्रात बातमी बघितल्यावर सिनेमाला वगळल्याचं समजलं. केंद्राच्या या निर्णयामुळे माझी निराशा झाली आहे. ज्युरी जो निर्णय घेतो तो अंतिम असतो, असं माझं व्यक्तिगत मत आहे. पण ज्युरी मेंबरला कल्पना न देता सिनेमाचं नाव वगळणं, कुणालाही रूचणार नाही. निर्णय घेताना ज्युरीला कल्पना द्यायला हवी होती, असं रवी जाधव यांनी म्हंटलं. सिनेमामध्ये काहीही आक्षेपार्ह नाही. पुढील आठवड्यात हा सिनेमा सेन्सॉर बोर्डाकडे जाणार असल्याचं दिग्दर्शक रवि जाधव यांनी म्हंटलं आहे.
न्यूड सिनेमाव्यतिरिक्त मल्ल्याळम सिनेमा 'एस.दुर्गा'ला सुद्धा इफ्फीतून वगळण्यात आलं आहे. या सिनेमातून समाजामधील गडद वास्तव आकर्षकपणे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन सनलकुमार ससिधरन यांनी केलं आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयाने जारी केलेल्या यादीत या सिनेमाचं नाव नसल्याचं समोर आलं आहे.