प्रजासत्ताकदिनी विरोधकांचे संविधान बचाव आंदोलन!, शरद पवार, फारुक अब्दुल्ला, शरद यादव होणार सहभागी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 04:33 AM2018-01-16T04:33:49+5:302018-01-16T11:45:17+5:30
वूई द पीपल आॅफ इंडिया..! ही आपल्या संविधानातली पहिली ओळ. त्याचाच आधार घेत देशभरातील समविचारी नेत्यांनी ‘संविधान बचाव आंदोलन’ मोहीम हाती घेतली आहे.
मुंबई : वूई द पीपल आॅफ इंडिया..! ही आपल्या संविधानातली पहिली ओळ. त्याचाच आधार घेत देशभरातील समविचारी नेत्यांनी ‘संविधान बचाव आंदोलन’ मोहीम हाती घेतली आहे. २६ जानेवारीला मंत्रालयाजवळच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून गेट वे आॅफ इंडियाजवळील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत मूक रॅली काढून विद्यमान सरकारच्या विरोधात असंतोषाला वाट मोकळी करून देण्याची सुरुवात यानिमित्ताने केली जाईल.
रॅलीत देशाचा तिरंगा झेंडा फक्त प्रत्येकाच्या हाती असेल. कोणत्याही घोषणा दिल्या जाणार नाहीत किंवा हजारोंची गर्दी जमवून ताकद दाखविण्याचाही मानस नसून संविधानाची गळचेपी रोखणे, व्यक्तिस्वातंत्र्यावरील घाला थांबवणे हा त्यामागे हेतू आहे. मात्र यानिमित्ताने केंद्र व राज्यातील भाजपा सरकारच्या विरोधात वातावरण तयार करण्यासाठी पक्षीय झेंडे बाजूला सारून एकत्र आणण्याचा प्रयत्न पडद्याआडून काही बडी राजकीय नेतेमंडळी करू पाहत आहेत. ही रॅली यशस्वी झाल्यानंतर कोलकाता, बंगळुरू, लखनऊ, पाटणा, हैदराबाद, चेन्नई, अहमदाबाद, तिरुअनंतपुरम या प्रमुख शहरांमध्येही हे आंदोलन होईल.
कोणत्याही पक्षाचा झेंडा खांद्यावर न घेता सर्वपक्षीय नेते, विचारवंत, सामाजिक क्षेत्रातील लोक एकत्र आणायचे आणि सरकारच्या विरोधातील असंतोष एकत्र करायचा, असा यामागे हेतू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार, ज्येष्ठ नेते शरद यादव, माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला, गुजरातेत उदयाला आलेले नवे नेतृत्व हार्दिक पटेल, खा. राजू शेट्टी, सीताराम येचुरी, योगेंद्र यादव, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खा. राजीव सातव, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, गणेश देवी, वनराज वंजारी अशा अनेकांनी २६ तारखेला मुंबईत येण्याचे मान्य केले आहे, अशी माहिती संविधान बचाव आंदोलन समितीचे सदस्य अभिषेक देशपांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
समविचारी लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न
देशपांडे म्हणाले, कॉ. गोविंद पानसरे यांच्या पत्नी उमाताई पानसरे, नरेंद्र दाभोलकर यांचे पुत्र हमीद दाभोलकर हेसुद्धा सहभागी होतील. आ. जिग्नेश मेवाणी, अल्पेश ठाकोर, प्रकाश रेड्डी, डॉ. भालचंद्र कांगो, पुरुषोत्तम खेडेकर, न्या. पी. बी. सावंत, शेकापचे जयंत पाटील यांनीही सहभागी होणार असल्याचे कळविले आहे.सामाजिक, आर्थिक, नाट्य, कला, साहित्य अशा विविध क्षेत्रांतील समविचारी लोक एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.