Republic Day 2018 : राजपथावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचा चित्ररथ, शिवसृष्टी पाहून खासदार संभाजीराजेंची 'जय भवानी, जय शिवाजी'ची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2018 11:09 AM2018-01-26T11:09:02+5:302018-01-26T14:12:29+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्ररथ राजपथावर आल्यानंतर शिवसृष्टी पाहून खासदार संभाजीराजे यांनी उभे राहून 'जय भवानी, जय शिवाजी'च्या घोषणा दिल्या.
नवी दिल्ली - देशभरात 69 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी इंडिया गेटवर अमर ज्योती येथे शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. तिन्ही दलांचे प्रमुख आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन या प्रसंगी उपस्थित होते. दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात आसियान (असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट नेशन्स) या आग्नेय आशियातील 10 देशांचे राष्ट्रप्रमुख सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत.
नवी दिल्लीत राजपथवर वेगवेगळ्या राज्यांचे चित्ररथांचं संचलन सुरू आहे. यावेळी महाराष्ट्राच्या चित्ररथात शिवराज्याभिषेक सोहळ्याचं दर्शन घडलं. ‘तेज तम अंस पर । कान्ह जिमि कंस पर। त्यों मलिच्छ बंस पर । सेर सिवराज है । या कविराज भूषण यांच्या वीररसाने भरलेल्या काव्याचा उद्घोष करत शिवरायांची किर्ती सांगणारा चित्ररथ राजपथावर उतरला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्ररथ राजपथावर आल्यानंतर शिवसृष्टी पाहून खासदार संभाजीराजे यांनी उभे राहून 'जय भवानी, जय शिवाजी'च्या घोषणा दिल्या.
महाराष्ट्राच्या चित्ररथातील कवी भूषण यांचं हे काव्य अजय-अतुलने संगीतबद्ध केलेलं आहे. ज्या राजधानी दिल्लीने छत्रपतींच्या स्वराज्याला कायम कमी लेखलं, ज्या दिल्लीश्वरांशी झगडण्यात शिवरायांचं आयुष्य खर्ची पडलं त्याच दिल्लीच्या मातीत अनेक राष्ट्रप्रमुखांच्या उपस्थितीत छत्रपतींच्या पराक्रमाची कीर्ती सांगणारा हा चित्ररथ दिमाखात अवतरला.
चित्ररथाच्या सुरुवातीला किल्ल्याची प्रतिकृती होती त्यावर मधोमध शिवरायांची अश्वारुढ प्रतिकृती दर्शवण्यात आलेली आहे. तर मध्यभागी रायगडाची प्रतिकृती असून त्या ठिकाणच्या मेघडंबरीत सिंहासनावर छत्रपती शिवराय विराजमान झालेले दाखवले. या ठिकाणी आभूषण देणारा दरबारी, त्याच्या शेजारी गागाभट्ट, तर या राज्याभिषेकासाठी उपस्थित असलेला इंग्रज अधिकारी सर हेन्री ऑक्सिजन दाखवले.
दरबारात छत्रपती शिवरायांच्या शेजारी बसलेल्या सोयराबाई आणि संभाजीराजे दाखवण्यात आले आहेत. चित्ररथाच्या मागच्या भागात आसनस्थ असलेल्या राजमाता जिजाऊ दर्शवण्यात आल्या आहेत. या चित्ररथाची संकल्पना ज्येष्ठ कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी सादर केली आहे.
दरम्यान, राजपथावर 14 राज्यांसह केंद्र सरकारच्या 7 खात्यांचे आणि भारत-आशियान राष्ट्रांचे संबंध दाखवणारे 2 चित्ररथ असे एकूण 23 चित्ररथ सादर होणार आहेत.
Delhi: The Maharashtra tableau at #RepublicDay parade, tableau is based on Chhatrapati Shivaji's coronation pic.twitter.com/wGIiV1vP7b
— ANI (@ANI) January 26, 2018