'संजू'विरोधात संघाने शंख फुंकला; बॉलिवूडमधील 'माफिया राज'वर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 06:37 PM2018-07-12T18:37:21+5:302018-07-12T18:38:27+5:30
बॉलिवूडचा 'मुन्नाभाई' अभिनेता संजय दत्त याच्या जीवनपटावरून - 'संजू' या चित्रपटावरून सुरू असलेल्या वादात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उडी घेतली आहे.
नवी दिल्लीः बॉलिवूडचा 'मुन्नाभाई' अभिनेता संजय दत्त याच्या जीवनपटावरून - 'संजू' या चित्रपटावरून सुरू असलेल्या वादात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उडी घेतली आहे. हा चित्रपट म्हणजे एका गुन्हेगाराचं उदात्तीकरण आहे, एक खलनायक सिनेमाचा नायक कसा होऊ शकतो?, अशी टीका 'पांचजन्य' या संघाच्या मुखपत्रातून करण्यात आली आहे.
'किरदार दागदार' या मथळ्याखाली लिहिलेल्या लेखात, 'संजू'च्या निर्मात्यांच्या हेतूवर शंका उपस्थित करण्यात आलीय. १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात संजय दत्त दोषी ठरला होता. पण या भूतकाळावर पडदा टाकून फक्त त्याच्या मेकओव्हरची गोष्ट सिनेमात दाखवण्यात आलीय. संजय दत्तने किती संघर्ष करून परिस्थितीवर मात केली, यावर दिग्दर्शकाचा प्रकाशझोत आहे. त्यातून समाजात चुकीचा संदेश जात असल्याची टिप्पणी 'पांचजन्य'ने केली आहे.
बॉलिवूड, सिनेसृष्टी माफियांच्या जाळ्यात अडकली आहे. त्यामुळेच देशाचे गुन्हेगार असलेल्या खलनायकांचं उदात्तीकरण केलं जातंय. 'संजू' किंवा 'रईस' यासारखे सिनेमे काढून नेमका काय आदर्श पुढच्या पिढीपुढे ठेवायचा आहे, असा सवालही त्यांनी केला आहे. दरम्यान, 'संजू' चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच त्याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर 'संजू'चे चाहते आणि विरोधक यांच्यात शाब्दिक चकमकी उडत आहेत. दुसरीकडे या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर सगळ्या सिनेमांना मागे टाकत जवळपास ३०० कोटींचा गल्ला जमवला आहे.