भगवा हा माझा रंग नाही, मुख्यमंत्री भेटीनंतर कमल हासन यांनी दिला राजकारणात प्रवेश करण्याचा संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 08:04 PM2017-09-01T20:04:41+5:302017-09-01T20:06:05+5:30
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची भेट घेतल्यानंतर अभिनेता कमल हासन राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आलं आहे
तिरुअनंतपुरम, दि. 1 - केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची भेट घेतल्यानंतर अभिनेता कमल हासन राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आलं आहे. या भेटीमुळे अभिनेता कमल हासन लवकरच दक्षिण भारतात सक्रीय राजकारणात प्रवेश करतील असा अंदाज लावला जात आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची भेट घेतल्यानंतर कमल हासन यांनी पत्रकारांशी बोलताना ही भेट अनुभवपुर्ण असल्याचं सांगितलं. भेटीआधी कमल हासन यांनी आपण केरळच्या मुख्यमंत्र्यांशी सल्ला-मसलत करण्यासाठी आलो असल्याचं सांगितलं होतं. भेटीनंतर बोलताना, आपण माझ्या चित्रपटांमध्ये अनेक रंग पाहिले असतील पण भगवा पाहिला नसेल असंही त्यांनी सांगितलं.
त्यांनी सांगितलं की, 'मी अन्य राजकारण्यांचीही भेट घेणार आहे, त्यानंतरच राजकारणात प्रवेश करण्यासंबंधीचा निर्णय घेईन'. कमल हासन बोलले की, 'येथे मी केरळ सरकारचं एक वर्ष पुर्ण झाल्यानिमित्त सेलिब्रेशन करण्यासाठी आलो आहे. हा माझ्यासाठी शिकवण देणारा अनुभव आहे. मी शिकेन आणि पुढे जाईन. यानंतर अनेक ठिकाणी मी शिकवण्यासाठी जाणार आहे'.
मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनीदेखील कमल हासन यांच्यासोबतच्या भेटीचे फोटो आपल्या फेसबूक अकाऊंटवर शेअर करत भेटीचा अनुभव शेअर केला आहे. आपल्या फेसबूक अकाऊंटवर पिनराई यांनी लिहिलं आहे की, 'कमल हासन माझे अत्यंत चांगले मित्र आहेत. यावेळी राजकारणावरही आम्ही चर्चा केली. खासकरुन तामिळनाडू आणि दक्षिण भारतातील राजकारणावर चर्चा झाली'.
कमल हासन यांनी एक दिवसापुर्वी आपल्या चाहत्यांना सेंट जॉर्ज फोर्टकडे मार्च करण्याचं आवाहन केलं होतं. सेंट जॉर्ज फोर्ट येथे तामिळनाडू विधानसभा आहे. अशावेळी कमल हासन यांनी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची भेट घेतल्याने वेगवेगळ्या चर्चा होत आहेत. डाव्या पक्षांशी हातमिळवणी करणार का ? असं विचारलं असता कमल हासन बोलले आहेत की, 'मी गेल्या 40 वर्षांपासून चित्रपटात काम करत आहे. माझ्या प्रत्येक रंगाला लोकांनी पाहिलं असेल. पण भगव्या रंगात कधीच पाहिलं नसेल एवढं नक्की'.