सीमा ओलांडल्या पण व्हिसा मिळेना, पाकिस्तानातील वधूची सुषमा स्वराजांकडे धाव
By admin | Published: July 4, 2017 12:16 PM2017-07-04T12:16:10+5:302017-07-04T13:55:07+5:30
कराचीमधील सादिया आणि लखनऊमधील सय्यद यांचं एकमेकांशी सूत जुळलं असून त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 4 - पाकिस्तानमधील तरुणी आणि भारतातील तरुण यांच्या प्रेमाचं रुपांतर लग्नात होण्यासाठी सर्व तयारी झाली आहे, फक्त गरज आहे ती व्हिसाची. कराचीमधील सादिया आणि लखनऊमधील सय्यद यांचं एकमेकांशी सूत जुळलं असून त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व सीमा ओलांडणारं त्याचं प्रेम व्हिसामुळे अडकलं आहे. 1 ऑगस्टला दोघं विवाहबंधनात अडकणार होते. मात्र त्यांचं राष्ट्रीयत्व प्रेमाच्या आड येत आहे. सादियाला व्हिसा मिळत नसल्याने अखेर तिने केंद्रीय परराष्ट मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे धाव घेतली असून मदत मागितली आहे.
सादिया आणि सय्यदने एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सादियाच्या कुटुंबियांनी व्हिसासाठी इस्लामाबादमधील भारतीय उच्च आयोगाकडे अर्ज केला. मात्र त्यांचा अर्ज नाकारण्यात आला. "माझा अर्ज दोन वेळा नाकारण्यात आला. अर्ज नाकारण्याचं कारणही सांगण्यात आलं नाही. आम्हाला खूप त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या एक वर्षापासून आम्ही व्हिसा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहोत", अशी माहिती सादियाने दिली आहे.
उरी हल्ल्यापासून ते कुलभूषण जाधवपर्यंत अनेक मुद्द्यांवर भारत पाकिस्तानमध्ये वाद सुरु असून दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. दोन्ही देशांमधील संबंध खराब झाल्यानेच आम्हाला व्हिसा मिळत नसल्याचा दावा सादियाने केला आहे. नेहमी ट्विटरच्या माध्यमातून समस्या सोडवणा-या सुषमा स्वराज यांच्याकडे सादियाने मदत मागितली आहे. "तुमच्या या मुलीची मदत करता. फक्त तुमच्याकडून मदतीची अपेक्षा राहिली आहे", असं ट्विट सादियाने सुषमा स्वराज यांना केलं आहे.
2012 मध्ये जेव्हा सादियाचं कुटुंब लखनऊमध्ये आलं होतं, तेव्हाच दोघांचं लग्न ठरवण्यात आलं. लग्नाची बोलणी झाल्यानंतर दोन्ही कुटुंबांनी पुढील चर्चा फोनवरुनच केली. मात्र लग्नामध्ये इतके विघ्न येतील यांची त्यांना अजिबात कल्पना नव्हती. सय्यद यानेदेखील सुषमा स्वराजांकडे मदत मागितली असून सर्व काही सुरळीत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.