सौदी अरेबियाने योगला खेळ घोषित करणे ऐतिहासिक - बाबा रामदेव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2017 01:15 PM2017-11-15T13:15:58+5:302017-11-15T13:17:59+5:30
जगभरात प्रसार पावलेल्या योग व्यायामप्रकाराला खेळाचा दर्जा देण्याची घोषणा सौदी अरेबियाने नुकतीच केली होती. सौदी अरेबियाने उचललेल्या या पावलाचे योगगुरू बाबा रामदेव यांनी स्वागत केले आहे.
नवी दिल्ली - जगभरात प्रसार पावलेल्या योग व्यायामप्रकाराला खेळाचा दर्जा देण्याची घोषणा सौदी अरेबियाने नुकतीच केली होती. सौदी अरेबियाने उचललेल्या या पावलाचे योगगुरू बाबा रामदेव यांनी स्वागत केले आहे. सौदी अरेबियासारख्या देशाने योगला खेळाचा दर्जा देण्याचे पाऊल उचलणे ऐतिहासिक आहे. योगला कुठल्याही धर्माच्या चौकटीत बंदीस्त करता येणार नाही. योग आचरणात आणल्याने भरपूर फायदे होऊ शकतात, असे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे.
एकीकडे भारतात योग हा व्यायामाचा प्रकार आहे की हिंदू धर्माचरणाता एक भाग यावरून वाद विवाद सुरू आहेत. मात्र दुसरीकडे कट्टर इस्लामिक देश असलेल्या सौदी अरेबियाने योगचा स्वीकार करताना योग ला खेळाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला होता. सौदी प्रशासनाकडून तसी अधिकृत मान्यता देण्यात आली.
सौदी अरेबियाच्या ट्रेड अँड इंडस्ट्रीने क्रीडाप्रकार म्हणून योग शिकवण्याला अधिकृत परवानगी नुकतीच दिली आहे. त्यामुळे सौदी अरेबियामध्ये अधिकृत परवाना घेऊन योग शिकवता येणार आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे नोफ मारवाई या महिलेला सौदी अरेबियामधील पहिली योग प्रशिक्षक म्हणून मान्यता देण्यात आली आहे. सौदी अरेबियामध्ये योगला खेळ म्हणून मान्यता मिळवून देण्याचे श्रेय नोफ यांनाच जाते. नोफ यांनी योगला खेळाचा दर्जा मिळावा म्हणून दीर्घकाळापासून अभियान राबवले होते.
अरब योग फाऊंडेशनच्या संस्थापक असलेल्या नोफ यांचे मत आहे की, योग आणि धर्म यांच्यात कोणत्याही प्रकारचा वाद नाही. 27 सप्टेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने योगला जागतिक मान्यता दिली होती. तसेच 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून घोषित केला होता.