जे काही झालं ते दुर्दैवी, शरद यादव यांचा नितीश कुमारांवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2017 12:06 PM2017-07-31T12:06:03+5:302017-07-31T12:36:23+5:30
आपण नितीश कुमार यांच्या निर्णयाशी असहमत असून जे काही झालं ते खूप दुर्देवी होतं असं शरद यादव बोलले आहेत
नवी दिल्ली, दि. 31 - नितीशकुमारांच्या नेतृत्वाखाली जद (यु) बिहारच्या महाआघाडीतून बाहेर पडला. भाजपाशी हातमिळवणी केल्यानंतर पक्षाचे राज्यसभेतील ज्येष्ठ नेते शरद यादव यांनी नितीश कुमारांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत हल्लाबोल केला आहे. आपण नितीश कुमार यांच्या निर्णयाशी असहमत असून जे काही झालं ते खूप दुर्दैवी होतं असं शरद यादव बोलले आहेत. संसदेबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना शरद यादव यांनी आपलं मौन सोडत हे वक्तव्य केलं.
'नितीश कुमार यांच्या निर्णयाशी आपण असहमत असून जे काही झालं ते खूप दुर्दैवी होतं. लोकांनी यासाठी आपल्याला मतं दिली नव्हती', असं शरद यादव बोलले आहेत.
रविवारीदेखील शरद यादव यांनी ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली होती. ‘पनामा पेपर्समध्ये उल्लेख असलेल्या भारतीयांपैकी एकालाही मोदी सरकारने पकडलेले नाही. परदेशात दडवलेले काळेधन परत आणणार ही मोदींची मुख्य घोषणा होती. त्या दिशेने केवळ निवडक कारवाईच आजपर्यंत झाल्याचे चित्र आहे. विविध सेवांच्या नावाखाली सरकार जनतेकडून विविध प्रकारचे सेस वसूल करीत आहे. या रकमेतून कोणत्याही क्षेत्रात उल्लेखनीय बदल झालेला नाही. असफल ठरलेली पीक विमा योजना याचे ठळक उदाहरण आहे. केवळ खासगी कंपन्यांना नफा मिळवून देण्याची व्यवस्था या योजनेतून झाल्याचा टोलाही त्यांनी लगावला', असल्याची टीका त्यांनी ट्विटमधून केली होती.
बिहारमधील महाआघाडीतून जद(यु)ने तडकाफडकी बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यापासून शरद यादव नितीशकुमारांवर नाराज असल्याची उघड चर्चा राजधानीत आहे. अर्थमंत्री अरूण जेटली आणि नितीशकुमारांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केल्यानंतर रविवारपर्यंत यादव गप्प होते. विशेषत: नितीशकुमारांच्या विरोधात एक शब्दही ते बोललेले नाहीत. शरद यादवांशी थेट दूरध्वनीवरून संपर्क साधून लालूप्रसाद यांनी त्यांना राष्ट्रीय जनता दलात प्रवेश करण्याचे त्यांना आवाहन केले.
लालूप्रसाद यादव यांनीदेखील ट्विटवरुन आपलं मत मांडलं होतं. 'देशात गरीब, वंचित व शेतकरी वर्गावर संकट कोसळले आहे. या आपत्तीतून त्यांना बाहेर काढण्यासाठी एक जोरदार आंदोलन उभे करावे लागेल. देशाला पुन्हा एका नव्या संघर्षाची आता गरज आहे, शरदभाई त्यासाठी तुम्ही या. पूर्वीही आपण बरोबर संघर्ष केला आहे. लाठ्या खाल्ल्या आहेत. पुन्हा एकदा सारे मिळून या दक्षिणपंथी हुकुमशाहीला नेस्तनाबूत करू', असं लालूप्रसाद यादव बोलले होते.