शशिकला व कुटुंबीयांना पक्षातून बाहेर रस्ता
By Admin | Published: April 20, 2017 12:45 AM2017-04-20T00:45:26+5:302017-04-20T00:45:26+5:30
तामिळनाडूतील वेगवान राजकीय घडामोडीत सरचिटणीस शशिकला, टीटीव्ही दिनकरन व त्यांच्या कुटुंबीयांना
चेन्नई : तामिळनाडूतील वेगवान राजकीय घडामोडीत सरचिटणीस शशिकला, टीटीव्ही दिनकरन व त्यांच्या कुटुंबीयांना अण्णाद्रमुकपासून दूर ठेवण्याचा निर्णय पक्षाने घेतला. त्यामुळे दोन गटांतील ऐक्याची प्रक्रिया सोपी झाली आहे. शशिकला
यांच्या विरुद्धच्या धर्मयुद्धातील हे पहिले यश आहे असे ओ. पनीरसेल्वम यांनी म्हटले आहे.
पनीरसेल्वम म्हणाले की, अण्णाद्रमुक पक्ष शशिकला कुटुृंबाच्या हातात जाऊ नये यासाठी आपण संसद सदस्य आणि आमदारांच्या मदतीने धर्मयुद्ध छेडले होते. मंगळवारी रात्री उशिरा मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार शशिकला, टीटीव्ही दिनाकरन व त्यांच्या कुटुंबाला अण्णाद्रमुक पक्षापासून व सरकारच्या कामकाजापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जनता आणि पक्ष कार्यकर्ते यांच्या इच्छेनुसारच हा संघर्ष सुरु केला होता आणि तो यापुढेही सुरुच राहिल.
आमदार आपल्या पाठिशी
अण्णाद्रमुकचे सर्व आमदार आपल्या पाठीशी आहेत. पक्षात कोणीही आपल्या विरोधात नाही, असा दावा करतानाच, ऐक्याच्या प्रक्रियेच्या आड आपण येणार नाही, असे दिनकरन यांनी म्हटले आहे. दिनकरन यांच्याविरुद्ध निर्णय घेतल्यानंतर यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, पक्षाच्या हितासाठी लवकरच एक चांगला निर्णय घेतला जाईल. आर्थिक गुन्ह्यासंबंधीच्या एका प्रकरणात ते आज न्यायालयात हजर राहण्याची शक्यता आहे. फेरा नियमांच्या उल्लंघनप्रकरणी त्यांच्याविरुद्ध एक प्रकरण सुरु आहे.
दिनकरन यांच्याविरुद्ध
लुक आउट नोटीस
दिनकरन यांच्याविरुद्ध लाचेच्या प्रकरणात लुक आउट नोटीस जारी झाल्यानंतर तिच्या आवश्यकतेवरच दिनकरन यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आपला पासपोर्ट न्यायालयात असताना मी पळून कसा काय जाणार?,असा सवाल त्यांनी केला. आपल्याच गटाला दोन पानांचे निवडणूक चिन्ह मिळावे यासाठी दिनकरन यांनी लाच देऊ केल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. दिनकरन अनिवासी भारतीय असून ते देश सोडून बाहेर जाऊ शकतात, अशी शक्यता गृहित धरून नोटीस जारी झाली आहे.