शशिकला यांना तुरुंगात व्हीआयपी वागणूक
By admin | Published: July 14, 2017 04:45 AM2017-07-14T04:45:35+5:302017-07-14T04:45:35+5:30
अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस शशिकला यांना बंगुळुरू तुरुंगामध्ये व्हीव्हीआयपी वागणूक मिळत असल्याचे उघडकीस आले
बंगळुरू : बेहिशेबी संपत्तीप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस शशिकला यांना बंगुळुरू तुरुंगामध्ये व्हीव्हीआयपी वागणूक मिळत असल्याचे उघडकीस आले आहे. तुरुंग उपमहानिरीक्षक डी रूपा यांनी या बेकायदेशीर गोष्टी करण्यास तुरुंगातील अधिकारीच परवानगी देत असल्याचा आरोप केला आहे. स्टॅम्प घोटाळ्यातील अब्दुल करीम तेलगीलाही तुरुंगात विशेष सुविधा मिळाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
त्यांच्या या तक्रारीची दखल घेत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. पण डी. रूपा यांनी तुरुंगांतील या प्रकारांची माहिती प्रसिद्धी माध्यमांना दिल्यामुळे कर्नाटकचे पोलीस महासंचालक (कारागृह) सत्यनारायण राव संतापले आहेत.
डी रूपा यांनी सत्यनारायण राव व पोलीस महानिरीक्षक आर के दत्ता यांना पत्र लिहून हा खुलासा केला आहे. शशिकला यांना स्वयंपाकासाठी स्वतंत्र रुम देण्यात आली आहे. शशीकला यांना महिन्यातून दोन जणांना भेटण्याची परवानगी असताना ३१ दिवसांत १४ लोक भेटले, असेही डी.रूपा यांनी निदर्शनास आणून दिले आहे. तुरुंगातील २५ जणांची १0 जुलै रोजी ड्रग टेस्ट घेण्यात आली होती. त्यापैकी १८ जणांनी त्यावेळी ड्रग घेतल्याचे निष्पन्न झाले, असेही त्यांनी अहवालात म्हटले आहे.
कारागृहात होणाऱ्या नियमांच्या उल्लंघनाकडे मी आपले लक्ष वेधू इच्छित आहे. शशीकला यांना व्हीव्हीआयपी वागणूक देण्याच्या बदल्यात दोन कोटी रुपयांची लाच घेण्यात आली आहे. आपण संबंधितांवर कारवाई करावी, असेही डी. रूपा यांनी अहवालवजा पत्रात म्हटले आहे.
"सत्यनारायण राव यांनी मात्र कारागृहात कोणालाही व्हीआयपी वागणूक दिली जात नाही, असा दावा केला असून, उपमहानिरीक्षकांना काही चुकीचे वा अयोग्य आढळले होते, तर त्यांनी ते आपल्या निदर्शनास आणून देणे गरजेचे होते. त्यांनी प्रसिद्धी माध्यमांकडे जाण्याचे कारण नव्हते, असे म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
अण्णा द्रमुक
तिथूनच चालवतात!
बेहिशेबी संपत्तीप्रकरणी न्यायालयाने शिक्षा जाहीर केल्यानंतलर शशिकला यांनी
१६ फेब्रुवारी रोजी न्यायालयात आत्मसमर्पण केलं होतं. त्यानंतर त्यांना कारागृहात पाठवण्यात आले.
अण्णा द्रमुकचे राजकारण त्या आजही तेथूनच चालवतात, असा आरोपही त्यांच्यावर केला जात आहे.