शोभा डेंची नको ती टिवटिव, महिला क्रिकेटपटूंवर केले ट्विट !
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2017 09:48 PM2017-08-02T21:48:56+5:302017-08-02T21:54:52+5:30
वादग्रस्त आणि फटकळ वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लेखिका शोभा डे या पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. नेहमीप्रमाणे काहीतरी वादग्रस्त ट्विट
मुंबई, दि. 2 - वादग्रस्त आणि फटकळ वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लेखिका शोभा डे या पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. नेहमीप्रमाणे काहीतरी वादग्रस्त ट्विट करून चर्चेत राहणाऱ्या शोभा डे पुन्हा एकदा बरळल्या आहेत. यावेळी त्यांनी भारतीय महिला क्रिकेटपटूंवर ट्विट करुन वाद ओढवून घेतला आहे.
महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारणा-या भारतीय महिला क्रिकेटपटूंच्या कामगिरीवर अनेकांकडून कौतुक होत आहे. मात्र शोभा डे यांनी 'देवा या हुशार महिला क्रिकेटपटूंना व्यावसायिकीकरण व लोभापासून वाचव, त्यामुळे पुरूष क्रिकेटपटू उद्ध्वस्त झाले आहेत' असे ट्विट केले आहे.
दरम्यान, शोभा डेंच्या या टवि्टवर नेटिझन्सनी नाराजी व्यक्त करत रिट्विट केले आहे. यामध्ये काहीजणांनी शोभा डे सध्या महिला क्रिकेटपटूंच्या निमित्ताने स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे. काहींनी 'देवा यूजलेस, वर्कलेस, पेज थ्री स्तंभलेखकांपासून आमच्या क्रिकेटपटूंचे रक्षण कर' असे ट्विट केले आहे. एकाने तर 'महिला क्रिकेटपटूंनी व्यावसायिकीकरण केले तर बिघडले कुठे फक्त पुरूष क्रिकेटपटूंनीच श्रीमंत व्हावे असे तुम्हांला वाटते काय?' असा सवाल केला आहे. तसेच, शोभा डे क्रिकेटपटूंशी ईर्षा करतात, त्यांना महिला क्रिकेटपटूंचे एवढे कौतुक झाल्याचे पाहवत नाही, असेही एकाने म्हटले आहे. याचबरोबर, अनेकांनी व्यावसायिकीकरणामुळे कोणत्या क्रिकेटपटूचे करिअर खराब झाले ते तरी सांगा? असा सुद्धा सवाल केला आहे.
याआधी सुद्धा अनेकवेळा शोभा डे यांनी वादग्रस्त ट्विट केली आहेत. गेल्या दिवसांपूर्वी शोभा डे यांनी मध्य प्रदेशमधील दौलतराम जोगावत या स्थूल पोलीस अधिका-याचे छायाचित्र पोस्ट करून मुंबई पोलिसांची ट्विटरवर खिल्ली उडविली होती. यावर शोभा डे यांच्या विरोधात देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत होता.
Oh Lord! Please protect our amazing women cricketers from crass commercialisation and greed that has ruined most of our Boys in Blue.
— Shobhaa De (@DeShobhaa) August 1, 2017