आसामातील पूरस्थिती गंभीर; १४ लाख लोकांना फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 04:35 AM2019-07-14T04:35:28+5:302019-07-14T04:35:49+5:30
आसामातील पूरस्थिती गंभीर झाली असून आणखी तीन जणांच्या मृत्यूनंतर मृतांची संख्या सहा झाली आहे. २१ जिल्ह्यांतील १४ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे.
गुवाहाटी : आसामातील पूरस्थिती गंभीर झाली असून आणखी तीन जणांच्या मृत्यूनंतर मृतांची संख्या सहा झाली आहे. २१ जिल्ह्यांतील १४ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बक्सा जिल्ह्यात लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. एनडीआरएफच्या पथकाने आतापर्यंत ८५0 नागरिकांची पुरातून सुखरूप सुटका केली आहे.
आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, गोलाघाट आणि दिमा हसाव जिल्ह्यांत आणखी तीन जण मृत्युमुखी पडले आहेत. दोन जण गोलाघाट जिल्ह्यात, तर एक जण दिमा हसाव जिल्ह्यात मरण पावला. राज्यातील २१ जिल्ह्यांना पुराने घेरले आहे. पूरग्रस्त जिल्ह्यांत धेमजी, लखीमपूर, बिस्वनाथ, सोनीतपूर, दारंग, बक्सा, बारपेट, नालबारी, चिरंग, बोंगाईगाव, कोक्राझार, गोलपाडा, मोरीगाव, होजई, गोलाघाट, मजुली, जोरहाट, शिवसागर, दिब्रुगढ आणि तीनसुकिया यांचा समावेश आहे.
पुराचा सर्वाधिक फटका बारपेट जिल्ह्याला बसला आहे. या जिल्ह्यातील ३.५ लाख लोक पुराच्या तडाख्यात सापडले आहेत. त्याखालोखाल धेमजी जिल्ह्यातील १.२ लाख लोकांना पुराचा तडाखा बसला आहे. बोंगाईगाव जिल्ह्यातील ६२,५00 नागरिक पुराच्या तडाख्यात सापडले
आहेत.
>दीड हजार गावे गेली पाण्याखाली
चिरंग, बारपेट आणि बक्सा या जिल्ह्यांत अनेक ठिकाणी पुराच्या पाण्याने जमीन वाहून गेली आहे. १,५५६ गावे पाण्याखाली गेली आहेत. २७,८६४.१६ हेक्टरवरील पिके नष्ट झाली आहेत. नदी काठावर बांधण्यात आलेले कूस, रस्ते, पूल आणि इतर बांधकामे वाहून गेली आहेत. प्रशासनाने ११ जिल्ह्यांत ६८ मदत छावण्या उभारल्या आहेत. त्यात ७,६४३ लोकांनी आश्रय घेतला आहे.