टीएमसीच्या 6 आमदारांची बंडखोरी, त्रिपुरा विधानसभेत भाजपा दुसरा मोठा पक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2017 06:33 PM2017-08-07T18:33:25+5:302017-08-07T18:33:36+5:30
तृणमूल काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेले 6 आमदार भाजपाच्या गोटात सामील झाले आहेत.
नवी दिल्ली, दि. 7 - भारतीय जनता पार्टीनं उत्तर-पूर्वेकडच्या राज्यांत सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केली असतानाच त्रिपुरा विधानसभेत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून भाजपा समोर आला आहे. तृणमूल काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेले 6 आमदार भाजपाच्या गोटात सामील झाले आहेत. त्यामुळे एकही आमदार नसलेल्या त्रिपुरा विधानसभेत भाजपाला अचानक 6 आमदारांचं बळ मिळालं आहे.
भाजपा आता त्रिपुरा विधानसभेतील प्रमुख विरोध पक्ष बनला आहे. तिस-या आणि शेवटच्या स्थानी असलेल्या काँग्रेसजवळ फक्त 4 आमदार आहेत. पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे सुदीप रॉय बर्मन, आशिष कुमार साहा, दीबा चंद्र हंगखावस, बिस्व बंधू सेन, प्रांजित सिंह रॉय आणि दिलीप सरकार यांना तृणमूल काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलंय. 2013मधल्या त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत डाव्यांनी 60 पैकी 50 जागा जिंकून सत्ता मिळवली होती. त्यावेळी काँग्रेसला 10 जागा मिळाल्या होत्या, तर टीएमसीला साधं खातंही उघडता आलं नव्हतं. मात्र 2016मधली पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक डावे आणि काँग्रेसनं एकत्र मिळून लढली. त्यावेळी या 6 आमदारांनी डाव्यांची साथ सोडत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करणे पसंत केले होते. मात्र तृणमूल काँग्रेसनंही गेल्या काही दिवसांपूर्वीच या 6 आमदारांची पक्षविरोधी कारवाई केल्याच्या कारणास्तव पक्षातून हकालपट्टी केली होती. त्यामुळे हे 6 आमदार भाजपामध्ये दाखल झाले असून, त्रिपुरा विधानसभेत भाजपा दुसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे.
एखाद्या विधानसभेत पक्षाकडे बहुमतासाठी पुरेसे संख्याबळ असताना इतर आमदारांनी बंडखोरी केल्यास त्यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही. जर एखाद दुस-या आमदारानं असं केलं असतं तर त्यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द झालं असतं. मात्र काँग्रेसमध्येच असताना 6 आमदारांच्या एका गटानं बंडखोरी केली होती. आता त्याच 6 आमदारांनी भाजपामध्ये जाणं पसंत केलं आहे. एनडीएचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना समर्थन दिल्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसनं या आमदारांची हकालपट्टी केली.
येत्या त्रिपुरा विधानसभेच्या निवडणुकीआधीच हे 6 आमदार भाजपाच्या गोटात सामील झाल्यानं भाजपाला त्रिपुरात बळ मिळालं आहे. या 6 आमदारांना तृणमूल काँग्रेसमधून भाजपामध्ये आणण्याचं श्रेय आसामचे भाजपाचे नेते आणि शिक्षा मंत्री हिमंत विश्वकर्मा यांना जातं. भाजपा त्रिपुरात कधीच कोणताही जागा जिंकू शकलेली नाही. तसेच तृणमूल काँग्रेसचे इतरही पदाधिकारी लवकरच भाजपामध्ये सहभागी होतील, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.