...म्हणून सोनिया गांधी यांनी पंतप्रधानांना लिहले पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2017 06:42 PM2017-09-21T18:42:33+5:302017-09-21T18:43:06+5:30
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे. सरकारनं आगामी अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक आणावं असं त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.
नवी दिल्ली, दि. 21 : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे. सरकारनं आगामी अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक आणावं असं त्यांनी या पत्रात नमूद केले आहे. या विधेयकाला काँग्रेस पूर्णपणे पाठिंबा देणार असल्याचं आश्वासनही त्यांनी या पत्रात दिले आहे.
लोकसभा आणि राज्यांच्या विधीमंडळात महिलांना 33 टक्के आरक्षण देणारं विधेयक देवेगौडा सरकारने 12 सप्टेंबर 1996 रोजी आणलं होतं. पण 15 वी लोकसभा 2014 मध्ये विसर्जित झाली आणि हे विधेयक मंजुरीशिवाय रखडलं. मात्र आता विरोधात असताना काँग्रेसनं या विधेयकाचा मुद्दा पुढं आणलाय आणि भाजपच्या कोर्टात चेंडू टोलवलाय. त्यामुळं पंतप्रधान मोदी या पत्राला काय प्रतिसाद देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
लोकसभेत भाजप बहुमतात आहे. त्याचा लाभ उठवत हे 21 वर्षांपासून रखडलेले महिला आरक्षण विधेयक मंजूर करा, जेणेकरून लोकसभेतही हे विधेयक मंजूर होईल. आम्ही या विधेयकाच्या मंजुरीसाठी केंद्र सरकारला पाठिंबा देऊ, असे सोनियांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
सोनियांनी मोठ्या खुबीनं दुर्गापूजेच्या मुहूर्त साधत महिला आरक्षणाची मागणी केलीय. काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारच्या १० वर्षांच्या काळात काँग्रेसनं महिला आरक्षणाचं विधेयक आणण्याचा प्रयत्न केला. मात्र समाजवादी पार्टीसारख्या पक्षांनी त्याला तीव्र विरोध केला होता. त्यामुळं हे विधेयक गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे.