Sonali Bendre : अभिनेत्री सोनाली बेंद्रेला झालेला 'हाय ग्रेड कॅन्सर' म्हणजे नक्की काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2018 01:29 PM2018-07-04T13:29:42+5:302018-07-04T13:49:58+5:30
मायक्रोस्कोपखाली कॅन्सरच्या पेशींची तपासणी करुनच त्याची ग्रेड ठरवली जाते.
मुंबई- अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने आपल्याला हाय ग्रेड कॅन्सर झाल्याचे ट्वीट करुन आपल्या आजाराबद्दल सर्वांना माहिती दिली आहे. कॅन्सरचे अनेक प्रकार त्याच्या स्वरुपावरुन, तो पसरण्याच्या वेगावरुन ठरत असतात. त्यातीलच 'हाय ग्रेड' हा एक प्रकार आहे. मायक्रोस्कोपखाली कॅन्सरच्या पेशींची तपासणी करुनच त्याची 'ग्रेड' ठरवली जाते.
'हाय ग्रेड' या कर्करोगामध्ये कर्करोगाच्या पेशी 'लो ग्रेड' कर्करोगापेक्षा वेगाने वाढतात आणि वेगाने पसरतात. कर्करोगाचे असे ग्रेडस केल्यामुळे त्या रोगाचे पुढील चढउतार व संभाव्या उपचार यांचा विचार डॉक्टरांना करणे सोपे जाते. 'हाय ग्रेड' या कर्करोगामध्ये उपचार पद्धती आणि उपचार 'लो ग्रेड'पेक्षा अधिक तीव्रतेचे व वेगाने करावे लागतात.
ग्रेडसनुसार कर्करोग कोणत्या वेगाने वाढत आहे हे समजून येते.
- ग्रेड 1- यामध्ये कर्करोगाच्या पेशी सामान्य पेशींप्रमाणे दिसतात व वेगाने वाढत नसतात.
- ग्रेड 2- यामध्ये कर्करोगाच्या पेशी सामान्य पेशींप्रमाणे दिसत नसतात व सामान्य पेशींपेक्षा वेगाने वाढत असतात.
- ग्रेड 3- यामध्ये कर्करोगाच्या पेशी असामान्य दिसतात आणि अत्यंत वेगाने आक्रमक पद्धतीने वाढत असतात.
सोनाली बेंद्रेने आपली कॅन्सरशी झुंज सुरू असल्याची माहिती तिनं स्वतः ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. सोनालीनं बुधवारी ट्विटरवर एक भावनिक पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. सध्या अमेरिकेतील न्यू-यॉर्क शहरात सोनालीवर उपचार सुरू आहेत.
— Sonali Bendre Behl (@iamsonalibendre) July 4, 2018
सोनालीने आपल्या ट्विटर तसंच इन्स्टा अकाऊंटवर भावनिक पोस्टमध्ये लिहिले आहे की, ''कधी कधी आयुष्यात अशी वळणं येतात, ज्याबाबत आपण कधीच विचार केलेला नसतो. मला हायग्रेड कॅन्सर असल्याचे निदान झाले आहे. माझे कुटुंबीय आणि मित्र-परिवार मला आजाराशी लढण्याचे बळ देताहेत. या गंभीर आजारावर उपचार घेण्यासाठी मी न्यूयॉर्कला आले आहे. विचित्र स्वरुपात शारीरिक वेदना झाल्यानंतर काही वैद्यकीय तपासणीअंती कॅन्सरचे निदान झाले''. सोनालीची ही पोस्ट वाचून तिच्या चाहत्यांना धक्काच बसला आहे. ''सोनाली Get Well Soon', असं म्हणत चाहते तिच्या आरोग्यासाठी प्रार्थनासाठी करत आहेत.