लष्कर-ए-तय्यबाचा विशेष कसाब क्लास
By Admin | Published: July 7, 2014 04:25 AM2014-07-07T04:25:09+5:302014-07-07T04:25:09+5:30
मुंबई हल्ल्याच्या वेळी पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याने केलेल्या चुका टाळण्याचे प्रशिक्षण दहशतवादी संघटना लष्कर-ए-तय्यबा आपल्या नवीन दहशतवाद्यांना विशेष ‘कसाब क्लास’च्या माध्यमातून देत आहे.
श्रीनगर/ नवी दिल्ली : मुंबई हल्ल्याच्या वेळी पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याने केलेल्या चुका टाळण्याचे प्रशिक्षण दहशतवादी संघटना लष्कर-ए-तय्यबा आपल्या नवीन दहशतवाद्यांना विशेष ‘कसाब क्लास’च्या माध्यमातून देत आहे.
लष्कर-ए-तय्यबाचा दहशतवादी मोहंमद जट ऊर्फ अबू हंझाला गेल्या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात दक्षिण काश्मीरमध्ये अटक करण्यात आली होती. तो मूळचा पाकिस्तानातील मुलतान येथील रहिवासी आहे. त्याच्या चौकशीतून ही बाब उघडकीस आली.
जट याचे वडील पाकिस्तानी सैन्यातील निवृत्त चालक आहे. लष्कर-ए-तय्यबाची एक संघटना जमात-ऊद-दावाकडून चालविल्या जाणाऱ्या मदरशामध्ये त्याचे आणि त्याच्या भावडांचे शिक्षण झाले आहे, अशी माहिती जट याने चौकशीदरम्यान दिली.
२००८ च्या मुंबई हल्ल्याप्रकरणी फासावर चढविण्यात आलेल्या कसाबला भेटल्याची कबुली देणारा जट हा पहिलाच दहशतवादी आहे.
दक्षिण काश्मीरमध्ये अनेक पोलिसांना ठार करण्याचा आरोप त्याच्यावर आहे. मुलतान जिल्ह्यात बोरवाला साहिवाला येथील दहशतवादी प्रशिक्षण केंद्रामध्ये आपली कसाबशी ओळख झाली. या मदरशामध्ये कसाब याचे वडील खाटीक होते. या मदरशात जटने प्रशिक्षण घेतले होते. लष्कर-ए-तय्यबा नवीन प्रशिणार्थींना कसाबच्या चुकांसंदर्भात माहिती देत असल्याचे जट याने चौकशीदरम्यान सांगितले. अशा प्रकारची माहिती २००९ मध्ये मकसर अकसर शिबिरात ‘दौऊरा-ए-सुफा’ या प्रशिक्षण कार्यक्रमात देण्यात आली, असेही त्याने
सांगितले.
जट हा पाचवी नापास असून, उत्तर काश्मीरमधील केरान मार्गे आॅक्टोबर २०१२ मध्ये काश्मीरमध्ये दाखल झाला. त्याने २१ दहशतवाद्यांसह २०१३ च्या हिवाळा दाचीगाम जंगलात घालवला आणि त्यानंतर तो दक्षिण काश्मीरमध्ये आला. तो पोलीस आणि निमलष्कर दलाच्या जवानांना ठार करण्याच्या कामगिरीवर होता, असा दावाही जट याने केला. (वृत्तसंस्था)