हलवा सेरेमनी अर्थसंकल्प निर्मितीचा प्रारंभीचा टप्पा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2018 05:07 PM2018-01-21T17:07:29+5:302018-01-21T17:09:10+5:30
अर्थसंकल्पाबाबत अनेक विशेष घटना किंवा वैशिष्ट्ये आपल्याला माहिती असतात. बजेट मांडण्यापूर्वी खुद्द अर्थमंत्री एका कढईतून अर्थमंत्रालयातील कर्मचाऱ्यांना हलवा वाटत आहेत, असे छायाचित्र प्रसिद्ध होतात.
नवी दिल्ली- अर्थसंकल्पाबाबत अनेक विशेष घटना किंवा वैशिष्ट्ये आपल्याला माहिती असतात. बजेट मांडण्यापूर्वी खुद्द अर्थमंत्री एका कढईतून अर्थमंत्रालयातील कर्मचाऱ्यांना हलवा वाटत आहेत, असे छायाचित्र प्रसिद्ध होतात. त्याला ''हलवा सेरेमनी"(हलवा वाटण्याचा कार्यक्रम) असे नावच पडून गेले आहे. वर्षांमागून वर्षे गेली तरी हा कार्यक्रम आजही साजरा केला जातो. हा कार्यक्रम साजरा करण्यामागेही एक महत्त्वाचे कारण आहे.
अर्थसंकल्पाची निर्मिती ही भारतामध्ये अत्यंत गोपनीय बाब समजली जाते आणि अर्थमंत्र्यांचे अर्थसंकल्पीय भाषण पूर्ण होईपर्यंत त्यातील माहिती बाहेर समजू नये याची काळजी घेतली जाते. या प्रक्रियेच्या सुरुवातीच्या दिवशी एका मोठ्या कढईमध्ये हलवा तयार केला जातो आणि तो अर्थमंत्रालयातील संबंधिक कर्मचाऱ्यांमध्ये वाटला जातो. या कार्यक्रमाला स्वतः अर्थमंत्री उपस्थित राहातात. तसेच अर्थराज्यमंत्रीही यावेळेस उपस्थित राहातात. हा कार्यक्रम संपल्यावर साधारणतः 100 कर्मचारी नॉर्थ ब्लॉकच्या बेसमेंटमध्ये जातात.
साधारणतः दहा दिवस अर्थसंकल्प निर्मितीची प्रक्रिया सुरु असते. या काळामध्ये कर्मचाऱ्यांना आपल्या कुटुंबीय, मित्र, नातेवाईंकांशी कोणताही संपर्क ठेवता येत नाही. त्यांना नॉर्थ ब्लॉकमध्येच राहावे लागते. तसेच मोबाईल, इ-मेल अशा कोणत्याही माध्यमाचा त्यांना वापर करता येत नाही. तसेच कर्मचाऱ्यांच्या सर्व हालचालींवर अधिकाऱ्यांचे निरीक्षण असते. नॉर्थ ब्लॉकमध्ये अत्यंत चांगल्या क्षमतेचा मोबाइल जॅमर बसवल्यामुळे कोणतीही माहिती मोबाइलवरुन बाहेर जाऊ शकत नाही.
अर्थसंकल्पाची निर्मिती झाल्यावरही मुद्रित अर्थसंकल्प अत्यंत कडेकोट बंदोबस्तात संसदेत आणला जातो. त्यासाठी संरक्षणाच्या उपाययोजना केलेल्या असतात. हलवा वाटप कार्यक्रम या सर्व प्रक्रियेचा प्रारंभ झाला असे घोषित करण्यासाठी केला जातो. त्यामुळेच अर्थसंकल्प निर्मितीसारख्या महत्त्वाच्या कामामध्ये या कार्यक्रमाला विशेष महत्त्व आले आहे.