सुपरसॉनिक इंटरसेप्टर क्षेपणास्राची यशस्वी चाचणी
By admin | Published: May 16, 2016 04:07 AM2016-05-16T04:07:13+5:302016-05-16T04:07:13+5:30
बॅलिस्टिक मिसाईल सुरक्षा प्रणाली प्राप्त करण्याच्या प्रयत्नांतर्गत भारताने रविवारी स्वदेशी सुपरसॉनिक इंटरसेप्टर क्षेपणास्राची यशस्वी चाचणी घेतली
बालासोर : संपूर्णपणे बहुस्तरीत बॅलिस्टिक मिसाईल सुरक्षा प्रणाली प्राप्त करण्याच्या प्रयत्नांतर्गत भारताने रविवारी स्वदेशी सुपरसॉनिक इंटरसेप्टर क्षेपणास्राची यशस्वी चाचणी घेतली. हे क्षेपणास्र त्याच्या दिशेने येणाऱ्या कोणत्याही शत्रू क्षेपणास्राला हवेतच नष्ट करण्यास सक्षम आहे.
उड्डाणाच्या स्थितीत इंटरसेप्टरच्या अनेक मापदंडांची वैधता तपासण्यासाठी ही चाचणी घेण्यात आली. ही चाचणी पूर्णत: यशस्वी राहिली, असे संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या (डीआरडीओ) सूत्रांनी सांगितले. या इंटरसेप्टरसाठी पृथ्वी क्षेपणास्राच्या नौदल आवृत्तीला लक्ष्य म्हणून समोर ठेवण्यात आले होते. बंगालच्या उपसागरात उभ्या असलेल्या युद्ध नौकेवरून हे क्षेपणास्र डागण्यात आले.
लक्ष्यरूपी क्षेपणास्र सकाळी ११.१५ वाजता डागण्यात आले आणि इंटरसेप्टर ‘अॅडव्हॉन्स्ड एअर डिफेन्स क्षेपणास्त्र अब्दुल कलाम बेटावर तैनात करण्यात आले होते. त्याला रडारवरून संकेत मिळत होते. या इंटरसेप्टरने लक्ष्यरूपी क्षेपणास्राला आकाशातच नष्ट केले.
अनेक निगराणी स्रोतांपासून इंटरसेप्टरच्या मारक क्षमतेचा अभ्यास करण्यात आला, असे डीआरडीओच्या एका शास्त्रज्ञाने सांगितले.