...म्हणून 800 वर्षांपासून सबरीमाला मंदिरात महिलांना नव्हता प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 11:13 AM2018-09-28T11:13:59+5:302018-09-28T11:16:21+5:30
आता सर्व वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश मिळणार
नवी दिल्ली: केरळमधील सबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेशाबद्दल सर्वोच्च न्यायालयानं ऐतिहासिक निकाल दिला आहे. सबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश दिला जावा, असा निर्णय न्यायालयानं दिला आहे. याआधी 10 ते 50 वर्ष वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नव्हता. महिलांना मंदिरात प्रवेशबंदी करणं घटनाबाह्य असल्याचं न्यायालयानं निकाल देताना म्हटलं.
सबरीमाला मंदिर प्रकरणात न्यायालय महिलांच्या बाजूनं निकाल देईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. या प्रकरणाच्या शेवटच्या सुनावणीत न्यायालयानं आपला रोख स्पष्ट केला होता. मंदिर प्रवेशात भेदभाव केला जाऊ शकत नाही. देवाचं दर्शन हा महिलांचा घटनात्मक अधिकार आहे, असं न्यायालयानं सुनावणी म्हटलं होतं. यानंतर न्यायालयानं आपला निर्णय राखून ठेवला होता. तो आज सुनावण्यात आला.
का होती मंदिरात प्रवेशबंदी?
केरळमधील सबरीमाला मंदिरात 10 ते 50 वर्ष वयोगटातील महिलांना प्रवेश दिला जात नव्हता. विशेषत: 15 वर्षांहून अधिक वयाच्या मुलींना मंदिरात प्रवेश नाकारण्यात येत होता. केवळ लहान मुली आणि वृद्ध महिलांना या मंदिरात प्रवेश दिला जायचा. मंदिरात विराजमान असलेले अयप्पा ब्रम्हचारी होते, अशी श्रद्धा आहे. सबरीमाला यात्रेच्या आधी 41 दिवस कठोर व्रत करण्याचा नियम आहे. मासिक पाळीमुळे महिला सलग 41 दिवस व्रत करू शकत नाहीत. त्यामुळेच 10 ते 50 या वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नव्हता.