सुरेश प्रभू यांनी रेल्वेमंत्रिपद सोडले, पियुष गोयल नवे रेल्वे मंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2017 11:46 AM2017-09-03T11:46:22+5:302017-09-03T12:39:39+5:30
केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज अखेर रेल्वे मंत्रालयाचा राजीनामा दिला आहे. आज सकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर काही वेळातच प्रभू यांनी ट्विट करून या निर्णयाची माहिती दिली.
नवी दिल्ली, दि. 3 - केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज अखेर रेल्वे मंत्रालयाचा राजीनामा दिला आहे. आज सकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर काही वेळातच प्रभू यांनी ट्विट करून या निर्णयाची माहिती दिली. तसेच कार्यकाळादरम्यान सहकार्य करणाऱ्या 13 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने होत असलेल्या रेल्वे अपघातांंमुळे सुरेश प्रभू हे टीकेचे लक्ष्य झाले होते.
आता प्रभू यांच्या जागी पियूष गोयल यांच्याकडे रेल्वे मंत्रालय सोपवण्यात आले आहे. तर प्रभू यांच्याकडे पर्यावरण किंवा उर्जा मंत्रालय सोपण्यात येऊ शकते.
Thanks to all 13 Lacs+ rail family for their support,love,goodwill.I will always cherish these memories with me.Wishing u all a great life
— Suresh Prabhu (@sureshpprabhu) September 3, 2017
काही दिवसांपूर्वी झालेल्या रेल्वे अपघातांची जबाबदारी स्वीकारत, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आपल्या पदाचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देऊ केला होता. मात्र मोदींनी त्यांचा राजीनामा न स्वीकारता प्रभू यांना ‘थांबा’ असा सल्ला दिला होता.
उत्तर प्रदेशात १९ ऑगस्ट रोजी उत्कल एक्स्प्रेस रुळांवरून घसरून २३ जण ठार व ४00 लोक जखमी झाले. त्यानंतर, पुन्हा उत्तर प्रदेशातच कैफियत एक्स्प्रेसच्या अपघातात ७0 हून अधिक प्रवासी जखमी झाले होते. अपघातानंतर रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष ए. के. मित्तल यांनी राजीनामा दिला. त्यानंतर, काही तासांनी सुरेश प्रभू यांनी पंतप्रधानांची भेट घेतली आणि त्यांनीही राजीनामाही सादर केला. मात्र, तो न स्वीकारता मोदी यांनी त्यांना थांबण्यास सांगितले आहे. स्वत: सुरेश प्रभू यांनीच टिष्ट्वटरवरून ही माहिती दिली. ते म्हणाले की, या अपघातांमुळे आपण अतिशय दु:खी आहोत. जखमी झालेल्यांचे, तसेच मृतांच्या नातेवाईकांचे दु:ख पाहून मला त्रास झाला आहे. अपघात टळावेत व जनतेला चांगली रेल्वेसेवा मिळावी, यासाठी मी घाम गाळला व रक्त आटवले. रेल्वेत सुधारणेसाठी पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली अनेक पावले टाकली. मात्र, अपघातांची जबाबदारी स्वकारून मी राजीनामा सादर केला आहे. मात्र त्यानंतर पुन्हा मुंबईजवळील कसारा येथे दुरान्तो एक्स्प्रेसला मोठा अपघात झाला होता.