पुन्हा करणार सर्जिकल स्ट्राईक? लष्करप्रमुख बिपिन रावत म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 08:55 AM2018-09-24T08:55:26+5:302018-09-24T08:57:08+5:30

पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची गरज लष्करप्रमुखांनी व्यक्त केली

surgical strike is a weapon of surprise says army chief general bipin rawat | पुन्हा करणार सर्जिकल स्ट्राईक? लष्करप्रमुख बिपिन रावत म्हणतात...

पुन्हा करणार सर्जिकल स्ट्राईक? लष्करप्रमुख बिपिन रावत म्हणतात...

googlenewsNext

नवी दिल्ली: गेल्याच आठवड्यात जम्मू-काश्मीरमध्ये तीन पोलिसांची दहशतवाद्यांनी निर्घृण हत्या केली. या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे भारतीय सुरक्षा दलांच्या हाती  लागले आहेत. यानंतर भारताचे लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याची गरज व्यक्त केली. यावेळी लष्करप्रमुखांना भारतीय सैन्याकडून पुन्हा सर्जिकल स्ट्राईक केला जाणार का?, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर सर्जिकल स्ट्राईकचा वापर सरप्राईज म्हणून केला जातो. त्यामुळे सर्जिकल स्ट्राईक सरप्राईज म्हणूनच राहू द्या, असं उत्तर रावत यांनी दिलं. 

संयुक्त राष्ट्राच्या महासभेदरम्यान भारत-पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक होणार होती. मात्र या बैठकीआधी जम्मू-काश्मीरमध्ये तीन पोलिसांची दहशतवाद्यांनी निर्घृणपणे हत्या केली. या हत्यांचे आदेश सीमेपलीकडून देण्यात आल्याचे पुरावे भारतीय सुरक्षा दलांच्या हाती लागले. त्यामुळे मोदी सरकारनं न्यूयॉर्कमध्ये होऊ घातलेली पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचं लष्करप्रमुखांनी समर्थन केलं. 'शांततेसाठीची चर्चा आणि दहशतवादी कारवाया एकाचवेळी होऊ शकत नाही. सरकारनं चर्चा रद्द करुन अगदी योग्य निर्णय घेतला आहे. आम्ही दहशतवादाला पायबंद घालू इच्छितो, हे दाखवणारी एखादी ठोस कृती पाकिस्ताननं करुन दाखवावी,' असं रावत यांनी म्हटलं.

जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या दहशतवादी कारवायांचं मूळ नेमकं कुठे आहे, यावर बोलताना लष्करप्रमुखांनी नाव न घेता पाकिस्तानच्या दिशेनं इशारा केला. 'आम्ही आमच्या देशाच्या सीमेचा वापर शेजारी देशांमध्ये दहशतवाद पसरावा यासाठी करत नाही, असं ते वारंवार म्हणतात. मात्र दहशतवादी कारवाया कुठून सुरू आहेत, हे आपण पाहतच आहोत. दहशतवादी सीमेपलीकडूनच जम्मू-काश्मीरमध्ये येतात, हे आपण वारंवार पाहिलं आहे,' असं रावत यांनी म्हटलं. पाकिस्तानला त्यांच्याच शब्दात उत्तर द्यायला हवं, असंदेखील ते म्हणाले. 
 

Web Title: surgical strike is a weapon of surprise says army chief general bipin rawat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.