आश्चर्य ! मृत्यू झाल्यानंतर 7 वर्षांनी लष्करी जवान घरी परतला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2016 08:02 AM2016-06-16T08:02:18+5:302016-06-16T10:35:56+5:30
लष्कराने मृत म्हणून घोषित केलेले जवान धरमवीर सिंग तब्बल 7 वर्षांनी आपल्या घरी परतले तेव्हा कुटुंबाला आश्चर्याचा धक्का बसला
>ऑनलाइन लोकमत -
देहरादून, दि. 16 - अभिनेता अक्षय कुमार आणि अश्विनी भावे यांचा सैनिक चित्रपट तुम्हाला आठवतो का ? त्या चित्रपटात अक्षय कुमार लष्कराचा जवान असतो आणि एक दिवस मोहिमेदरम्यान अचानक गायब होतो. सर्वांना वाटतं त्याचा मृत्यू झाला आहे, पण एक दिवस तो अचानक सर्वांसमोर येतो. चित्रपटातील हुबेहूब अशीच घटना धरमवीर सिंग यांच्या आयुष्यात घडली आहे.
लष्कर जवान धरमवीर सिंग यांचा सात वर्षांपुर्वी अपघात झाला होता ज्यामध्ये त्यांची स्मृती हरवली होती. हरिद्वारमधील रस्त्यांवर ते भटकत होते. लष्करानेदेखील त्यांना मृत घोषित केलं होतं. आणि अचानक एक दिवस कोणीही विचार करु शकत नव्हतं असं काही झालं. दुस-या अपघातामुळे धरमवीर सिंग यांची स्मृती परतली आणि तब्ब्ल 7 वर्षांनी ते आपल्या घरी परतले. घरच्यांसाठी तर हा आश्चर्याचा धक्काच होता.
धरमवीर सिंग 2009 पासून बेपत्ता होते. नियमाप्रमाणे तीन वर्षानंतर लष्कराने त्यांना मृत घोषित केलं. 'माझा भाऊ लष्कराच्या वाहनाने प्रवास करत असताना चकारता येथे त्याचा अपघात झाला होता. त्याच्यासोबत अजून दोन जवानदेखील होते. गाडी डिव्हायडरवर चढून अपघात झाला होता. पण शोधूनदेखील मृतदेह सापडलाच नव्हता', अशी माहिती राम निवास यांनी दिली आहे.
लष्कराने मृत्यूपत्र जारी केलं होतं, तसंच कुटुंबाला पेन्शनदेखील सुरु केली होती. कुटुंबाला धरमवीर सिंग जिवंत असतील याच्या फार कमी आशा होत्या. मात्र त्यांची पत्नी मनोज देवी यांना ते परत येतील असा विश्वास होता, त्यासाठी त्यांनी उपवासदेखील ठेवले होते.
अपघातानंतर काय झालं मला काहीच आठवत नसल्याचं धरमीवर सिंग सांगतात. 'हरिद्वारमधील रस्त्यांवर ते भीक मागत होते, त्यावेळी एका दुचाकीने त्यांना धडक दिली. त्या व्यक्तीने त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं तेव्हा तिथे त्यांना भूतकाळ आठवला. त्यांची स्मृती परतली', अशी माहिती डॉक्टर राम निवास यांनी दिली आहे.
'अपघातानंतर त्या दुचाकीस्वाराने मला 500 रुपये दिले. त्या पैशांनी मी दिल्लीचं तिकिट काढलं, आणि माझ्या घरी पोहोचलो. मला आश्चर्याचा धक्काच बसला आहे. माझ्या मुलींना ओळखणं मला कठीण जात आहे. त्या किती मोठ्या झाल्या आहेत', असं धरमवीर सिंग सांगतात. त्यांची एक मुलगी दहावीत शिकत असून दुसरी बारावीत आहे. त्यांना कुटुंबियांनी जयपूरला उपचारासाठी आणलं आहे.