तबरेज अन्सारीच्या पत्नीला नोकरी देणार : वक्फ मंडळ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 04:59 AM2019-06-28T04:59:39+5:302019-06-28T05:00:00+5:30
झारखंडमध्ये जमावाने केलेल्या मारहाणीत मरण पावलेल्या तबरेज अन्सारी (२४) याच्या पत्नीला दिल्ली वक्फ मंडळ पाच लाख रुपये आणि नोकरी देणार आहे.
नवी दिल्ली - झारखंडमध्ये जमावाने केलेल्या मारहाणीत मरण पावलेल्या तबरेज अन्सारी (२४) याच्या पत्नीला दिल्ली वक्फ मंडळ पाच लाख रुपये आणि नोकरी देणार आहे. ही माहिती गुरुवारी वक्फ मंडळाचे अध्यक्ष आणि आम आदमी पक्षाचे (आप) आमदार अमानतुल्लाह खान यांनी दिली.
अन्सारी याने चोरी केल्याच्या संशयावरून जमावाने त्याला गेल्या १९ जून रोजी सेराईकेला-खारसावान जिल्ह्यात पकडून खांबाला बांधले व जबर मारहाण केली. २२ जून रोजी त्याचा मृत्यू झाला. अन्सारी याला ‘जय श्रीराम’ आणि ‘जय हनुमान’ म्हणण्याची सक्तीही जमावाने केली गेल्याचे व्हिडिओमध्ये दिसले.
अन्सारी याच्या पत्नीला कायद्याची मदत मिळण्यासाठीही वक्फ मंडळ मदत करील, असे अमानतुल्लाह खान म्हणाले. तबरेजच्या पत्नीला पाच लाख रुपयांचा धनादेश पाठविण्याचा आम्ही प्रयत्न करीत असून, तो तिला देण्यासाठी मी बहुधा तेथे जाईन. वक्फ मंडळात आम्ही तिला नोकरीही देऊ आणि तिला विधिसाह्यही देऊ, असे खान यांनी सांगितले. अन्सारीच्या मृत्यूप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
तबरेज अन्सारीच्या झारखंडमध्ये जमावाकडून झालेल्या हत्येने मला तीव्र वेदना झाल्या. दोषी लोकांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी म्हटले होते. ते म्हणाले होते की, झारखंड, पश्चिम बंगाल किंवा केरळसह देशात कुठेही घडलेल्या हिंसाचाराच्या सगळ्या घटनांना एकाच मापात मोजले पाहिजे व त्यात कायद्याने त्याची भूमिका पार पाडली पाहिजे.