मनात शल्य व नाराजी ठेवून न्या. चेलमेश्वर झाले निवृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 12:24 AM2018-05-19T00:24:22+5:302018-05-19T00:24:22+5:30

देशाचे सरन्यायाधीश होण्याची संधी हुकल्याचे शल्य व नाराजी मनात ठेवून सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठतम न्यायाधीश न्या. जस्ती चेलमेश्वर शुक्रवारी न्यायालयीन कामकाजातून निवृत्त झाले.

Take heart and anger in your heart. Chelameswar retired | मनात शल्य व नाराजी ठेवून न्या. चेलमेश्वर झाले निवृत्त

मनात शल्य व नाराजी ठेवून न्या. चेलमेश्वर झाले निवृत्त

googlenewsNext

नवी दिल्ली : देशाचे सरन्यायाधीश होण्याची संधी हुकल्याचे शल्य व नाराजी मनात ठेवून सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठतम न्यायाधीश न्या. जस्ती चेलमेश्वर शुक्रवारी न्यायालयीन कामकाजातून निवृत्त झाले. गेली साडेसहा वर्षे ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.
वयोमानानुसार २२ मे न्या. चेलमेश्वर यांची निवृत्तीची तारीख. पण शनिवारपासून उन्हाळी सुटी लागत असल्याने शुक्रवार हा त्यांचा न्यायालयीन कामकाजाचा शेवटचा दिवस होता. एरवी सरन्यायाधीश व त्यांच्या नंतरचे ज्येष्ठतम न्यायाधीश एकाच खंडपीठावर नसणे ही न्यायालयाची परंपरा. परंतु क्रमांक २ चा न्यायाधीश निवृत्त होताना शेवटच्या दिवशी सरन्यायाधीशांनी त्यांना आपल्यासोबत घेऊन कोर्ट रूम नंबर १ मध्ये न्यायासनावर बसायचे अशी रूढ प्रथा आहे. त्यानुसार शुक्रवारी न्या. चेलमेश्वर सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा यांच्यासोबत खंडपीठात बसले. पण एकाच दिवशी नेमणूक झालेल्या या दोन न्यायाधीशांपैकी एक सरन्यायाधीश झाला व दुसरा होऊ शकला नाही हा नियतीचा खेळ अनेकांच्या नजरेतून सुटला नाही.
निवृत्त होणाऱ्या न्यायाधीशासाठी न्यायालयाकडून औपचारिक निरोप समारंभ होत नाही. वकील संघटना तसा निरोप समारंभ आयोजित करतात व त्यावेळी सरन्यायाधीशांसह अन्य न्यायाधीश निरोपाची भाषणे करतात. परंतु न्या. चेलमेश्वर यांनी निरोप समारंभाचे निमंत्रणही नाकारले. अलीकडेच न्या. के. एम. जोसेफ यांच्या सर्वोच्च न्यायालयावरील नेमणुकीची ‘कॉलेजियम’ची शिफारस केंद्राने परत पाठविण्यावरून वाद झाला. त्यावेळी माजी सरन्यायाधीश न्या. आर. एम. लोढा यांनी दिलेल्या प्रतिक्रियेतील एक भाग न्यायाधीश निवडीमागे नेमके काय घडत असते त्याकडे निर्देश करणारा होता. भविष्यात कोण न्यायाधीश कुठे असावा याची काही गणिते मांडून ‘कॉलेजियम’ शिफारस करत असते, असे न्या. लोढा म्हणाले होते.
‘कॉलेजियम’च्या अशाच गणितामुळे ज्येष्ठ असूनही न्या. चेलमेश्वर यांना सरन्यायाधीश न होता निवृत्त व्हावे लागले. उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांमधून सर्वोच्च न्यायालयावर न्यायाधीश निवडले जातात. न्या. चेलमेश्वर मुख्य न्यायाधीश म्हणून न्या. दीपक मिस्रा व न्या. जे. एस. केहार यांना दोन वर्षांनी ज्येष्ठ होते. न्या. चेलमेश्वर सन २००७ मध्ये तर न्या. मिस्रा व न्या. केहार सन २००९ मध्ये मुख्य न्यायाधीश झाले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयावर नेमणूक करताना न्या. केहार यांना सप्टेंबर २०११ मध्ये व न्या. चेलमेश्वर व न्या. मिस्रा यांना त्यानंतर एक महिन्याने म्हणजे आॅक्टोबर २०११ मध्ये नेमले गेले. न्या. चेलमेश्वर व न्या. मिस्रा यांचा सर्वोच्च न्यायालयात एकाच दिवशी शपथविधी झाला. न्या.मिस्रा यांनी आधी शपथ घेतल्याने सेवाज्येष्ठतेत ते ज्येष्ठ ठरले.
उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या ज्येष्ठतेनुसार सर्वोच्च न्यायालयावर नेमणूक झाली असती, तर न्या. टी. एस ठाकूर जानेवारी २०१७ मध्ये सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झाल्यावर न्या. चेलमेश्वर त्या पदावर येऊ शकले असते. पण तसे न होता न्या. ठाकूर यांच्यानंतर न्या. केहार व त्यांच्यानंतर न्या. मिस्रा सरन्यायाधीश झाले. त्यामुळे ज्येष्ठ असूनही न्या. चेलमेश्वर यांना त्यांच्याहून कनिष्ठ दोन सरन्यायाधीशांसोबत क्र. २ वर काम करावे लागले. शेवटी न्यायाधीश हाही माणूसच असतो. त्यामुळे राग, लोभ, नाराजी या मानवी भावना न्यायदान करताना नव्हे तरी व्यक्तिगत पातळीवर मनात येतच असतात. न्या. चेलमेश्वर यांनी जाहीर पत्रकार परिषद घेण्यामागे मनातील या अव्यक्त नाराजीचाही एक कंगोरा होता.
>...पण क्र. २ चे न्यायाधीश आजही स्मरणात!
सरन्यायाधीशांच्या विरोधात जाहीर पत्रकार परिषद घेणारे न्यायाधीश म्हणून ते निवृत्तीनंतरही ते दीर्घकाळ स्मरणात राहतील.मात्र, ज्येष्ठ वकील व माजी केंद्रीय कायदामंत्री शांतीभूषण यांनी गुरुवारी मुद्दाम न्या. चेलमेश्वर यांच्या न्यायालयात येऊन छोटेखानी संबोधनाने न्या. चेलमेश्वर यांना भावपूर्ण निरोप दिला. न्या. चेलमेश्वर यांना उद्देशून शांतीभूषण म्हणाले की, तुमच्या या कोर्ट रूम नं. २ मध्ये न्या. एच. आर. खन्ना यांचे तैलचित्र राहिले आहे. न्या. खन्ना हेही सरन्यायधीश न होता क्र. २ चे न्यायाधीश म्हणून निवृत्त झाले. भविष्यात तुमचाही फोटो या न्यायालयात लावला जावो, अशा आमच्या सदिच्छा आहेत. क्र. १ च्या यापूर्वीच्या अनेक सरन्यायाधीशांना देश विसरला, पण क्र. २ चे न्यायाधीश आजही स्मरणात आहेत, असा मार्मिक संदर्भही त्यांनी दिला. आणीबाणीत न्या. खन्ना यांची सेवाज्येष्ठता डावलून इंदिरा गांधींनी त्यांना डावलून न्या. रे यांना सरन्यायाधीश केले होते.

Web Title: Take heart and anger in your heart. Chelameswar retired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.