अमरनाथ यात्रेकरुंवरील हल्ल्याचा मुख्य सूत्रधार दहशतवादी अबू इस्माईल ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2017 05:18 PM2017-09-14T17:18:14+5:302017-09-14T18:40:44+5:30
अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार अबू इस्माईल ठार झाला आहे. नौगाम येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा जवानांनी अबू इस्माईलला ठार केलं आहे.
श्रीनगर, दि. 14 - अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार अबू इस्माईल ठार झाला आहे. नौगाम येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा जवानांनी अबू इस्माईलला ठार केलं आहे. अमरनाथमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अबू इस्माईल सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर होता. अखेर त्याला ठार करण्यात भारतीय लष्कराच्या जवानांना यश मिळालं आहे. अबू इस्माईलसोबत अजून एका दहशतवाद्याला ठार करण्यात आलं आहे.
अबू इस्माईल पाकिस्तानी नागरिक आहे, अबू दुजानासोबत त्याने काश्मीरमधील अनेक अतिरेकी हल्ल्यांमध्ये सहभाग घेतला होता. अमरनाथ दहशतवादी हल्ल्यानंतर बोलताना काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक मुनीर खान यांनी अबू इस्माईल हल्ल्यात सहभागी होता असं सांगितलं होतं. मुनीर खान बोलले होते की, हा हल्ला तैयबानेच केला आहे. त्याची जबाबदारी अबू इस्माईलवर होती. त्याला स्थानिक दहशतवाद्यांनीही मदत केली'.
महत्वाचं म्हणजे अबू दुजानाचा खात्मा केल्यानंतर जवानांनी अबू इस्माईल आणि हिजबूल, अलकायदाशी संबंधित झाकीर मूसा यांना ठार करण्यासाठी प्लान तयार केला होता अशी माहिती आहे.
अमरनाथ यात्रेतील भाविकांच्या बसवर 10 जुलै रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये 7 भाविकांचा मृत्यू झाला होता. तर 19 भाविक जखमी झाले होते. याआधी हल्ला करणाऱ्या 3 दहशतवाद्यांना जम्मू-काश्मीर पोलिसांनी अटक केली आहे. जम्मू-काश्मीर पोलिस महासंचालक मुनीर खान यांनी ही माहिती दिली होती. अटक करण्यात आलेले तिन्ही दहशतवादी लष्कर-ए-तोयबाचे आहेत. हल्ल्याचा मास्टरमाईंड अबू इस्माईल आणि इतर तीन दहशतवादी मात्र त्यावेळी फरार होते.
J&K: Lashkar commander Abu Ismail gunned down by Security forces in Nowgam. Ismail was involved in Amarnath attack earlier this year pic.twitter.com/AAFY2Q8Xba
— ANI (@ANI) September 14, 2017
दहशतवाद्यांच्या निशाण्यावर सीआरपीएफ आणि अमरनाथ यात्रेकरुंची बस होती. सुरुवातीला हा हल्ला 9 जुलै रोजी घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा मानस होता. पण त्या दिवशी सीआरपीएफ आणि अमरनाथ यात्रेकरुंची कोणतीही बस अमरनाथला जाणाऱ्या मार्गावरुन गेली नाही. त्यामुळे दहशतवाद्यांनी दुसऱ्याच दिवशी हल्ला घडवून आणला. या हल्ल्यामागील तिन्ही आरोपींना पकडण्यात आले असता त्यांनी गुन्हा कबूल केला . यात्रेकरूंच्या बससाठी दहशतवाद्यांनी शौकत आणि सीआरपीएफच्या गाडीसाठी बिलाल हा कोडवर्ड वापरला होता, हा पूर्णपणे दहशतवादी हल्लाच होता असेही मुनीर यांनी सांगितले होते.
नियमांचे उल्लंघन
यात्रेकरूंच्या ज्या बसवर हल्ला झाला ती गुजरातमधील बलसाड येथील होती. प्रवास सुरु करताना अनेक वाहने एकदम निघाली होती व त्यांच्यासोबत सुरक्षा दलांची सुरक्षा व्यवस्था होती. ही बस जेवणासाठी रस्त्यात मध्येच थांबली व इतरांपासून वेगळी पडली. नेमकी हिच संधी साधून अतिरेक्यांनी हा हल्ला केला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार यात्रेतील कोणत्याही वाहनाने सायंकाळी सात नंतर महामार्गावरून जाऊ नये, असा नियम आहे. परंतु बसच्या चालकाने सातनंतर बस महामार्गावरून नेऊन या नियमाचे उल्लंघन केले.केंद्रीय राखीव पोलीस दलाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार हल्ला झालेली ही बस यात्रेच्या अधिकृत वाहन ताफ्यापैकी नव्हती व तिची अमरनाथ यात्रा बोर्डाकडे रीतसर नोंदणीही केलेली नव्हती. ही बस अमरनाथ यात्रापूर्ण केलेल्या यात्रेकरूंना बलताल येथून परत घेऊन येत होती.
१७ वर्षांपूर्वीही झाले होते हत्याकांड
अमरनाथ यात्रेवर झालेला हा दुसरा मोठा दहशतवादी हल्ला होता. याआधी सन २००० च्या यात्रेत जुलै महिन्यात अतिरेक्यांनी यात्रेकरूंच्या पहेलगाम येथील बेस कॅम्पवर बॉम्ब फेकून व बेछुट गोळीबार करून केलेल्या हल्ल्यात २७ यात्रेकरू ठार तर ३६ जखमी झाले होते. नंतर सुरक्षा दलांनी केलेल्या प्रतिहल्ल्यात दोन दहशतवादी मारले गेले होते.