पाकिस्तानशी काहीही संबंध ठेवण्याची गरज नाही - गौतम गंभीर
By admin | Published: October 18, 2016 06:02 PM2016-10-18T18:02:40+5:302016-10-18T18:02:54+5:30
जोपर्यंत सीमारेषेपलीकडील दहशतवाद थांबत नाही तोपर्यंत आपण पाकिस्तानशी कोणताच संबंध ठेऊ नये असं परखड मत भारतीय फलंदाज गौतम गंभीरने व्यक्त केलं आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 18 - भारत - पाकिस्तानमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. चित्रपटांवर टाकण्यात आलेली बंदी हा चर्चेचा विषय असून पाकिस्तानसोबत भारताने संबंध ठेवावेत की नाही यावर प्रत्येकजण आपलं मत व्यक्त करत आहे. भारतीय फलंदाज गौतम गंभीरनेही या मुद्यावर रोखठोक मत व्यक्त करत 'जोपर्यंत सीमारेषेपलीकडील दहशतवाद थांबत नाही तोपर्यंत आपण पाकिस्तानशी कोणताच संबंध ठेऊ नये,' असं म्हटलं आहे. 'सीमेवर शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबांसोबत आपण उभं राहण्याची गरज असल्याचंही,' गौतम गंभीर बोलला आहे.
टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत गौतम गंभीरने हे वक्तव्य केलं आहे. 'जोपर्यंत दहशतवाद थांबत नाही तोपर्यंत आपण पाकिस्तानशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवू नयेत असं मला वाटतं. ज्यांनी जीव गमावला आहे त्यांच्याठिकाणी उभं राहून त्यांनी स्वत: ला पाहण्याची गरज आहे. क्रिकेट असो वा बॉलिवूड पाकिस्तानसोबत कोणतेच संबंध ठेवू नयेत,' असं गौतम गंभीर बोलला आहे.
'हो मी एका एसी रुममध्ये बसून हे बोलू शकतो की क्रिकेटला राजकारणाशी जोडू नका, बॉलिवूडचं राजकारण करु नका, पण तुम्ही जर शहीद झालेल्यांच्या नातेवाईकांना विचारलत तर तुम्हाला हेच उत्तर मिळेल. त्यामुळे जोपर्यंत आपण आपल्या लोकांची सुरक्षा करत नाही, इतर गोष्टी बाजूला ठेवायला हव्यात. दहशतवाद संपत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचं नातं ठेऊ नये या मतावर मी ठाम आहे,' असं गौतम गंभीरने सांगितलं आहे.