काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकांच्या तयारीसाठी नेमल्या तीन महत्त्वाच्या समित्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2018 05:36 AM2018-08-26T05:36:01+5:302018-08-26T05:36:45+5:30
कामाला लागण्याच्या सूचना : मुणगेकर, केतकर, देवरा, रजनी पाटील यांचा समावेश
शीलेश शर्मा
नवी दिल्ली : २0१९ च्या लोकसभा निवडणुकांची तयारीसाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी तीन समित्या स्थापन केल्या असून, त्यांवर अनेक नेत्यांबरोबरच महाराष्ट्रातील रजनी पाटील, भालचंद्र मुणगेकर, मिलिंद देवरा व कुमार केतकर यांना नियुक्त केले आहे. या समित्यांना तात्काळ काम सुरू करण्याच्या सूचना राहुल गांधी यांनी दिल्या आहेत.
कोअर ग्रुपमध्ये मल्लिकार्जुन खारगे, पी. चिदम्बरम, ए. के. अँथनी, गुलाम नबी आझाद, अशोक गेहलोत, के. सी. वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला, जयराम रमेश व अहमद पटेल आहेत. हा ग्रुप निवडणुकीशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेईल. त्यावर अंतिमत: राहुल गांधी मोहोर उठवतील. अन्य पक्षांशी व राज्यवार पक्षाची भूमिका निश्चित ही जबाबदारी या ग्रुपवर असेल.
निवडणूक जाहीरनामा समितीत रजनी पाटील व डॉ. मुणगेकर आहेत. शिवाय ललितेश त्रिपाठी, शशी थरूर, मुकुल संगमा, टी. साहू, सचिन राव, सॅम पित्रोडा, मीनाक्षी नटराजन, रघुवीर मीणा, कुमारी शैलजा, बिंदू कृष्णन,सलमान खुर्शिद, जयराम रमेश, भूपेंद्रसिंग हुडा, राजीव गौडा, सुष्मिता देव, पी. चिदंबरम, मनप्रीत ब्रार यांचाही समावेश आहे. याशिवाय १३ सदस्यांची प्रचार समितीही नेमली असून, त्यात मिलिंद देवरा व कुमार केतकर आहेत. अन्य सदस्यांत भक्तचरण दास, प्रवीण चक्रवर्ती, पवन खेडा, बी. डी. सतीशन, आनंद शर्मा, जयवीर शेरगील, राजीव शुक्ला, स्पंदना दिव्या, रणदीप सुरजेवाला व प्रमोद तिवारी यांचा समावेश आहे.
सुरजेवाला, वेणुगोपाल यांच्या निवडीने कुजबुज
कोअर ग्रुपवर रणदीप सुरजेवाला, के. सी. वेणुगोपाल आणि जयराम रमेश यांचा समावेश आहे, पण दिग्विजय सिंग, सिद्धरमय्या, जयपाल रेड्डी, अंबिका सोनी, कॅ. अमरेंद्र सिंग, मोतीलाल व्होरा, मुकुल वासनिक, शीला दीक्षित आदी अनुभवी नेत्यांना स्थान मिळालेले नाही.