सुप्रीम कोर्टात प्रथमच असणार तीन महिला न्यायाधीश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2018 04:43 AM2018-08-05T04:43:35+5:302018-08-05T04:43:45+5:30
न्या. इंदिरा बॅनर्जी यांच्या नियुक्तीने ६८ वर्षांच्या इतिहासात सर्वोच्च न्यायालयात प्रथमच एकाच वेळी तीन महिला न्यायाधीश न्यायपीठावर स्थानापन्न होणार आहेत.
नवी दिल्ली : न्या. इंदिरा बॅनर्जी यांच्या नियुक्तीने ६८ वर्षांच्या इतिहासात सर्वोच्च न्यायालयात प्रथमच एकाच वेळी तीन महिला न्यायाधीश न्यायपीठावर स्थानापन्न होणार आहेत. न्या. बॅनर्जी यांच्या नियुक्तीचा राष्ट्रपतींचा औपचारिक आदेश शुक्रवारी रात्री जारी झाला.
न्या. बॅनर्जी रुजू झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात त्यांच्यासह न्या. आर. भानुमती व न्या. इंदू मल्होत्रा अशा तीन महिला न्यायाधीश होतील. न्या. भानुमती जुलै २०२० मध्ये, न्या. मल्होत्रा मार्च २०२१ मध्ये व न्या. बॅनर्जी सप्टेंबर २०२२ मध्ये सेवानिवृत्त होतील. म्हणजेच पुढील किमान दोन वर्षे सर्वोच्च न्यायालयात महिला न्यायाधीशांची तीन ही संख्या कायम राहील. एकूण २५ पैकी तीन हे महिला न्यायाधीशांचे प्रमाणही आजवरचे सर्वाधिक असेल.
सन १९५२ ते १९८९ पर्यंत सर्वोच्च न्यायालयावर सर्व न्यायाधीश फक्त पुरुषच नेमले गेले. त्यानंतर आताच्या तिघी धरून आतापर्यंत या न्यायालयावर नेमलेल्या महिला ऩ्यायाधीशांची संख्या सात होईल. याआधी न्या. फितिमा बिवी, न्या. सुजाता मनोहर, न्या. रुमा पाल, न्या. ज्ञानसुधा मिश्रा व न्या. रंजना देसाई या महिला न्यायाधीश नियुक्त झाल्या होत्या. तरीही लगोलग निवृत्त्यांमुळे न्यायालयावर एकाहून अधिक महिला न्यायाधीश एकाच वेळी असण्याचा काळ फार कमी होता.
>काश्मीरमध्येही पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश
न्या. गीता मित्तल यांच्या नियुक्तीने जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयासही पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश लाभणार आहेत. किंबहुना न्या. मित्तल या त्या उच्च न्यायालयावरील पहिल्या महिला न्यायाधीश असतील. याआधी त्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या कार्यवाहक मुख्य न्यायाधीश होत्या.
न्या. जोसेफ व न्या. सरन यांचीही नियुक्ती जाहीर : ओडिशा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. विनित सरन व उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. के. एम. जोसेफ यांच्या सुप्रीम कोर्टावरील नियुक्तीचे आदेशही राष्ट्रपतींनी जारी केले. न्या. बॅनर्जी, न्या. सरन व न्या. जोसेफ या तिघांच्या नेमणुकीने तेथील न्यायाधीशांची संख्या २५ होईल. न्यायाधीशांची आणखी सहा पदे रिक्त आहेत.
>न्या. विजया ताहिलरामाणी मद्रासच्या चिफ जस्टिस
मुंबई उच्च न्यायालयाच्या कार्यवाहक मुख्य न्यायाधीश न्या. विजया कमलेश ताहिलरामाणी
यांची राष्ट्रपतींनी मद्रास उच्च न्यायालयावर मुख्य न्यायाधीश म्हणून नेमणूक केली आहे. त्या बहुधा सोमवारी नव्या पदावर रुजू होतील. याखेरीज आणखीही पाच उच्च न्यायालयांवर नवे मुख्य न्यायाधीश नेमले गेले आहेत. ते असे : न्या. हृषिकेश रॉय (केरळ), न्या. एम. आर. शहा (पाटणा), न्या. राजेंद्र मेनन (दिल्ली), न्या. अनिरुद्ध बोस (झारखंड) आणि न्या. कल्पेश झवेरी (ओडिशा)