रेल्वेखाली आल्याने तीन तरुणांचा मृत्यू, सेल्फी काढण्याच्या नादात गमावला जीव ?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2017 04:43 PM2017-10-03T16:43:02+5:302017-10-03T16:45:35+5:30
रेल्वेखाली आल्याने तीन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना बिदादी येथे घडली आहे. राजधानीपासून 30 किमी अंतरावर ही घटना घडली. अपघात झाला तेव्हा तिघे तरुण सेल्फी काढण्यात व्यस्त होते का ? याचा पोलीस तपास करत आहेत
बंगळुरु - रेल्वेखाली आल्याने तीन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना बिदादी येथे घडली आहे. राजधानीपासून 30 किमी अंतरावर ही घटना घडली. अपघात झाला तेव्हा तिघे तरुण सेल्फी काढण्यात व्यस्त होते का ? याचा पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी ही शक्यता वर्तवली असून, अपघात झाला तेव्हा तरुण नेमके ट्रेनपासून किती अंतरावर होते याचा अंदाज लावला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 9.30 ते 10 वाजण्याच्या सुमारास तिन्ही तरुणांचा मृत्यू झाला. दोन तरुणांची ओळख पटली आहे. बंगळुरुमधील नॅशनल कॉलेजमध्ये ते शिकत होते. काही वेळापुर्वी तिघे मित्र बंगळुरुजवळील अॅम्यूजमेंट पार्कात गेले होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दोन आठवड्यांमध्ये सेल्फीमुळे मृत्यू होणारी बंगळुरुमधील ही दुसरी घटना आहे.
गेल्या आठवड्यात, काही विद्यार्थी पिकनिकसाठी गेले होते. यावेळी मित्र तलावात बुडत असताना बाकी तरुण सेल्फी काढण्यात व्यस्त होते. योगायोगाने तेदेखील नॅशनल कॉलेजचे विद्यार्थी होते.
विश्वास तरुण तलावात बुडत होता तेव्हा तिथेच तलावात मजा मस्ती करणारे मित्र मात्र सेल्फी काढण्यात व्यस्त होते. सेल्फी काढण्याकडे लक्ष नसतं तर कदाचित आपला मित्र बुडत असल्याचं त्यांना कळलं असतं, आणि जीव वाचवला असता. 17 वर्षीय विश्वास नॅशनल कॉलेजचा विद्यार्थी होता. बंगळुरुपासून 40 किमी अंतरावर असणा-या रामनगर जिल्ह्यातील कनकपूरा येथे ही घटना घडली होती.
विश्वास जेव्हा तलावात बुडत होता तेव्हा इतर कॅडेट्स सेल्फी काढण्यात व्यस्त होते. 'जेव्हा विश्वास बुडत होता तेव्हा सर्वांचं लक्ष सेल्फीसाठी मोबाइलमध्ये होतं, त्यामुळे आपला मित्र बुडतोय हे त्यांना कळलंच नाही', अशी माहिती पोलीस अधिक्षक रमेश बानोथ यांनी दिली आहे. रमेश बानोथ यांनी सांगितल्यानुसार, 'जवळपास दुपारी 2 वाजता सर्व विद्यार्थी तलावाजवळ गेले होते. तलावात उतरत त्यांनी पोहायला सुरुवात केली. ग्रामपंचायतीने धोक्याचा इशारा देणारा बोर्ड लावूनही विद्यार्थ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. विश्वासचा तोल गेला आणि तो गाळात अडकला. बाहेर येईपर्यंत कोणालाही विश्वास आपल्यातून बेपत्ता झाल्याचं कळलंच नाही'.
3.30 वाजता विश्वासचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि त्यानंतर त्याच्या कुटुंबियांना कळवण्यात आलं. कुटुंबियांनी कॉलेज प्रशासनावर हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला. विश्वासच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली . 'तक्रारीच्या आधारे अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आम्ही तपास करत आहोत. आम्ही सर्व विद्यार्थ्यांची चौकशी करणार आहोत. मात्र अद्यार ते सर्व धक्क्यात आहेत', अशी माहिती पोलिसांनी दिली होती.