'आणखी एका सर्जिकल स्ट्राईकसाठी निवडणूक लांबवली'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 03:32 PM2019-03-12T15:32:45+5:302019-03-12T15:45:36+5:30
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी बंगालला त्रास देण्यासाठी आणखी एका हल्ल्याचा कट भाजपाने आखला असून त्यासाठीच येथील निवडणुका लांबवल्या जात असल्याचं म्हटलं आहे.
कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी बंगालला त्रास देण्यासाठी आणखी एका हल्ल्याचा कट भाजपाने आखला असून त्यासाठीच येथील निवडणुका लांबवल्या जात असल्याचं म्हटलं आहे. तसेच 'कृपया माझे म्हणणे चुकीच्या पद्धतीने मांडू नका कारण, निवडणूक आयोगासारख्या संविधानिक संस्थेचा मी सन्मान करते. मात्र, पश्चिम बंगालमध्ये वातावरण बिघडवण्याचा भाजपाचा डाव आहे' असे ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
ममता बॅनर्जी यांनी 'मी माझ्या राज्यातील लोकांना जाणते, त्यांच्याप्रती माझ्या मनात खूपच आदर आहे. मात्र, भाजपा त्यांचा अनादर करते. त्यांनी माझ्या आणि बंगालच्याविरोधात कट रचला आहे. मात्र, हा कट त्यांच्यावरच उलटणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच सात टप्प्यात मतदानाची घोषणा केवळ बिहार, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशातच करण्यात आली आहे. ही तीन राज्येच केंद्रात कोणाचे सरकार येणार हे निश्चित करणार आहेत असं एका प्रश्नाला उत्तर देताना ममता बॅनर्जी यांनी सांगितलं.
'तृणमूलच्या नेत्यांना खरेदी करण्यासाठी भाजपा ट्रेन भरुन पैसे आणतेय'
काही दिवसांपूर्वी तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना खरेदी करण्यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप पक्षाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जींनी केला होता. तृणमूलच्या नेत्यांनी पक्ष सोडावा, भाजपात सामील व्हावं, यासाठी पैशांच्या ऑफर दिल्या जात आहेत. त्यासाठी राज्याबाहेरुन पैसा आणला जात आहे, असा सनसनाटी आरोप बॅनर्जींनी केला होता. भाजपाकडून तृणमूलच्या नेत्यांना संपर्क करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावादेखील त्यांनी केला होता.
'भाजपाकडून तृणमूलच्या नेत्यांना खरेदी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपाकडून तृणमूलच्या नेत्यांना संपर्क केला जात आहे. तुम्हाला किती पैसा हवा, आम्हाला सांगा. आम्ही तुम्हाला हवा तितका पैसा देतो, आमच्या पक्षात या,' अशा ऑफर दिल्या जात असल्याचं ममता बॅनर्जींनी सांगितलं होतं. लोकसभा निवडणुकीच्या आधी राज्यात प्रचंड पैसा आणण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याचा दावा त्यांनी केला. 'बंगालमध्ये ट्रेननं काहीजण रोख रक्कम घेऊन येत आहेत. मतदारांना वाटण्यासाठी हा सर्व पैसा आणला जात आहे. याबद्दली सर्व माहिती माझ्याकडे आहे,' असं ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या.