परंपरा मोडली! नववधू ऐवजी सासूला भेट दिली दुचाकी, सोन्याची नथ
By admin | Published: May 8, 2017 11:49 AM2017-05-08T11:49:20+5:302017-05-08T11:49:20+5:30
गुजरातच्या राजकोट जिल्ह्यात रविवारी संपन्न झालेल्या एका सामुदायिक विवाहसोहळयामध्ये आयोजकांनी एका वेगळया परंपरेचा पायंडा पाडला.
Next
ऑनलाइन लोकमत
राजकोट, दि. 8 - गुजरातच्या राजकोट जिल्ह्यात रविवारी संपन्न झालेल्या एका सामुदायिक विवाहसोहळयामध्ये आयोजकांनी एका वेगळया परंपरेचा पायंडा पाडला. लग्नाच्यावेळी नववधूला तिच्या भावी संसारासाठी लागणा-या वस्तू देण्याची प्रथा आहे. पण आयोजकांनी या परंपरेला छेद देताना नववधूऐवजी तिच्या सासूला चक्क दुचाकी आणि अन्य महागडया वस्तूंची भेट दिली.
छोटया स्वरुपाच्या या सामुदायिक विवाह सोहळयामध्ये पाच कुटुंबे सहभागी झाली होती. या भेटवस्तू म्हणजे हुंडयाचा प्रकार नसून, एक वेगळी परंपरा सुरु करत आहोत असे आयोजकांनी सांगितले. लग्न झाल्यानंतर मुलीची सासरी पाठवणी करताना आई-वडील तिला नव्या घरात लागणा-या वस्तू देतात. काहीवेळा सासूलाही भेटवस्तू दिली जाते. यामागे आदराची भावना असते असे आयोजकांनी सांगितले.
सध्याच्या समाजव्यवस्थेत एकत्र कुटुंबपद्धती मोडीत निघाली आहे. बहुतांश जोडपी स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतात. यामुळे नव-या मुलाच्या आई-वडिलांना उतारवयात एकटेपणाची भावना येते. आजच्या समाजाचे हे वास्तव असून असे प्रकार वाढत चालले आहेत. त्यामुळे सासूबाईंना समाधान मिळावे तसेच एकत्र कुटुंब पद्धती टिकून रहावी यासाठी आम्ही वधूऐवजी सासूला भेट दिली असे आयोजकांनी सांगितले.
या भेटवस्तूंमध्ये दुचाकी, सोन्याची नथ, फ्रिज, बिछाने, पंखे अशा वस्तूंचा समावेश आहे. आयोजकांनी पहिल्यांदाच अशा प्रकारचा सामुदायिक विवाह सोहळा केला. नवविवाहीत जोडप्याने आपल्या ज्येष्ठांचा आदर करावा हीच यामागे भावना आहे असे आयोजकांनी सांगितले.