संघर्षाने नव्हे, तर जागृतीने ट्रिपल तलाक बंद व्हावा - मोदी
By admin | Published: April 17, 2017 03:26 AM2017-04-17T03:26:15+5:302017-04-17T03:26:15+5:30
मुस्लीम समाजात संघर्ष निर्माण करून नव्हे, तर जागृती करून ट्रिपल तलाकची कुप्रथा बंद करण्याचे प्रयत्न व्हायला हवेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे केले.
भुवनेश्वर : मुस्लीम समाजात संघर्ष निर्माण करून नव्हे, तर जागृती करून ट्रिपल तलाकची कुप्रथा बंद करण्याचे प्रयत्न व्हायला हवेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे केले.
भाजपाच्या दोन दिवसांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सामाजिक न्यायावर भर देताना पंतप्रधानांनी ट्रिपल तलाकचा उल्लेख केला. एवढेच नव्हे, तर ‘सबका साथ, सबका विकास’ हे सूत्र सफल करण्यासाठी मुस्लिमांमधील मागास वर्गांकडेही लक्ष देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना रस्ते आणि परिवहनमंत्री नितीन गडकरी म्हणाले की, मुस्लीम भगिनींनाही न्याय मिळायला हवा व त्यांच्यावर अन्याय होता कामा नये, असे मोदी म्हणाले. गडकरींच्या सांगण्यानुसार, पंतप्रधान असेही म्हणाले की, कोणाचीही पिळवणूक होता कामा नये. (ट्रिपल तलाकवरून) मुस्लीम समाजात संघर्ष व्हावा, असे आम्हाला वाटत नाही. समाजात काही कुप्रथा असतील, तर त्याविषयी समाजात जागृती निर्माण करून त्यांना (मुस्लीम महिलांना) न्याय देण्याचे काम करावे लागेल.
अलीकडच्या निवडणुकांमध्ये मतदानयंत्रांमध्ये गडबड केल्याचे विरोधकांनी भाजपावर केलेले आरोप साफ फेटाळून लावताना मोदी म्हणाले की, खास करून दिल्ली महापालिका निवडणुकांच्या तोंडावर हे वाद मुद्दाम निर्माण केले जात आहेत. असे वाद तयार करण्याचा त्यांच्याकडे जणू कारखानाच आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या वेळी चर्चवरील हल्ल्यांचा, बिहार निवडणुकीच्या वेळी ‘पुरस्कार वापसी’चा व आता मतदानयंत्रांचा वाद निर्माण केला जात आहे. (वृत्तसंस्था)
बोलताना काळजी घ्या
सार्वजनिक वक्तव्ये करताना काळजी घ्या आणि भावनेच्या आहारी जाऊन अनुचित विधाने करू नका, अशी समज भाजपाच्या नेत्यांना देताना मोदी म्हणाले की, तुमच्या काही तक्रारी व गाऱ्हाणी असतील तर तो विषय पक्षात मांडा व पक्षातूनच तो माझ्यापर्यंत पोहोचेल.
यशाने हुरळून जाऊ नका
अलिकडेच झालेल्या राज्य विधानसभांच्या निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशाने हुरळून न जाता पक्षाने असाच जोर कायम ठेवायला हवा, असे सांगून मोदी म्हणाले की, लोकसभेच्या ज्या १२० जागा सध्या भाजपाकडे नाहीत त्याही जिंकण्यासाठी पक्ष विशेष मोहीम हाती घेणार आहे. पक्षाच्या यशात पक्षाध्यक्ष अमित शहा यांचा मोठा वाटा आहे. निष्णात व्यूहरचनाकार म्हणून ते एक आदर्श आहेत, अशी त्यांनी स्तुती केली.
विनाकारण तलाक देणाऱ्यांवर बहिष्कार
नवी दिल्ली: मुस्लिम धर्मशास्त्रात दिलेल्या कारणांखेरीज अन्य कारणांसाठी पत्नीला तलाक देणाऱ्यांवर सामाजिक बहिष्कार टाकण्यात यावा, असे अ.भा. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने ठरविले आहे.
तलाक हा मुस्लिमांच्या धर्मशास्त्राशी निगडित विषय असल्याने तो त्यांचा मुलभूत हक्क आहे. त्यामुळे यात बाहेरच्या कोणालाही हस्तक्षेप करू दिला जाणार नाही, असे बोर्डाच्या कार्यकारिणी बैठकीत ठरविण्यात आले.
मात्र ट्रिपल तलाकचा पर्याय अगदीच अपवादात्मक प्रकरणांंमध्ये वापरला जाईल, याची खात्री करण्यासाठी समाजाच्या पातळीवर काही व़्यवस्था केली जाईल. ट्रिपल तलाकचा जे दुरुपयोग करतील त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकून त्यांना दंड करण्याचेही कार्यकारिणीने ठरविले, असे बोर्डाचे सदस्य मौलाना खालिद आर. फिरंगी यांनी सांगितले.
राम जन्मभूमी वादात कोर्टबाह्य तडजोड नाही
अयोध्येतील बाबरी मशीद-राम जन्मभूमी वादात आपसात चर्चा करण्याची सर्वोच्च न्यायालयाने केलेली सूचना आम्हाला मान्य नाही. आम्ही फक्त न्यायालय देईल तोच निर्णय मान्य करू, असा ठरावही बोर्डाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत संमत करण्यात आला.