या दोन पंतप्रधानांना नाही मिळाली लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवण्याची संधी
By Balkrishna.parab | Published: August 15, 2017 10:44 PM2017-08-15T22:44:36+5:302017-08-15T22:47:04+5:30
देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून ते मोदींपर्यंत स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावण्याची परंपरा कायम आहे. मात्र स्वतंत्र भारतात असे दोन पंतप्रधान होऊन गेले ज्यांना लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावण्याची संधी मिळाली नाही.
मुंबई, दि. 15 - देशभरात आज 71 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौथ्यांदा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावत देशवासियांना संबोधित केले. देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून ते मोदींपर्यंत स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावण्याची परंपरा कायम आहे. मात्र स्वतंत्र भारतात असे दोन पंतप्रधान होऊन गेले ज्यांना लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावण्याची संधी मिळाली नाही.
हे दोन पंतप्रधान म्हणजे दोन वेळा देशाचे पंतप्रधानपद भूषवणारे गुलझारी लाल नंदा आणि दुसरे चंद्रशेखर. गुलझारीलाल नंदा हे दोन वेळा देशाचे हंगामी पंतप्रधान झाले. जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर 27 मे 1964 ते 9 जून 1964 या कालावधीत गुलझारीलाल नंदा यांनी हंगामी पंतप्रधान म्हणून काम पाहिले. त्यानंतर 11 ते 24 जानेवारी 1966 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा हंगामी पंतप्रधान म्हणून काम पाहिले होते. त्यामुळे त्यांना स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवून देशाला संबोधित करण्याची संधी मिळाली नाही.
पंतप्रधानपद भूषवूनही देशाला संबोधित करण्याची संधी न मिळालेले दुसरे पंतप्रधान म्हणजे चंद्रशेखर. चंद्रशेखर यांनी 10 नोव्हेंबर 1990 ते 21 जून 1991 या काळात देशाचे पंतप्रधानपद भूषवले. पण त्यांचा कार्यकाळ स्वातंत्र्य दिनाआधीच संपुष्टात आल्याने त्यांनाही लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवण्याची संधी मिळाली नाही.
लाल किल्ल्यावरून सर्वाधिक वेळा तिरंगा फडकवण्याचा विक्रम देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नावे आहे. त्यांनी 1947 ते 1964 दरम्यान सलग 17 वेळा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला होता. त्यानंतर नंबर लागतो तो इंदिरा गांधींचा. इंदिरा गांधी यांनी 1966 ते 1984 दरम्यान 16 वेळा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला होता. तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दहावेळी लाल किल्ल्यावरून ध्वजवंदन केले.
अटल बिहारी वाजपेयी हे सर्वाधिक सहावेळा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवणारे गैर काँग्रेसी पंतप्रधान आहेत. त्यांनी 1998 ते 2004 दरम्यानच्या आपल्या कारकिर्दीत सहावेळा लाल किल्यावरून ध्वजवंदन केले होते.
दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर ध्वजवंदन करुन सलग चौथ्यांदा देशवासियांना संबोधित केले. देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, स्वातंत्र्य दिनाच्या या शुभप्रसंगी देशवासियांना कोटी-कोटी शुभेच्छा. संपूर्ण देश आज स्वातंत्र्य दिनासोबत जन्माष्टमीचाही उत्सव साजरा करत आहे. सुदर्शन चक्राधारी मोहनपासून ते चरखाधारी मोहनपर्यंतचा वारसा आपल्याला लाभला आहे.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी, देशाच्या गौरवासाठी हजारो लोकांनी बलिदान दिलं, यातना-दु:ख सोसले, त्या सर्व वीरांना सव्वाकोटी देशवासियांतर्फे नमन करतो, असेही उद्गार यावेळी पंतप्रधान मोदींनी काढले.