'मोदींच्या काळात दहशतवादी कारवायांमध्ये 176% अन् शहीद जवानांच्या संख्येत 93% वाढ'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 03:58 PM2019-03-05T15:58:35+5:302019-03-05T15:59:31+5:30
माकपचे राष्ट्रीय सरचिटणीस सिताराम येचुरी यांनी म्हटलं की, दहशतवादाविरुद्ध संपूर्ण देश एकत्र आला आहे.
नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाकडून मोदी आणि भाजपा सरकारविरुद्ध मोहिम राबविण्यात येत आहे. मोदी सरकारकडून पुलवामा हल्ला आणि एअर स्ट्राईकचे राजकारण केले जात असल्याचे सीपीएमने म्हटले आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारला उघडं पाडण्याचं काम सीपीएम करेल, असा ठरावच सीपीएमच्या झालेल्या बैठकीत करण्यात आला आहे. त्यानुसार सीपीएमचे सरचिटणीस सिताराम येचुरी यांनी मोदी सरकारच्या कार्यकाळात वाढलेल्या दहशतवादी घटनांची आकडेवारीच दिली आहे.
माकपचे राष्ट्रीय सरचिटणीस सिताराम येचुरी यांनी म्हटलं की, दहशतवादाविरुद्ध संपूर्ण देश एकत्र आला आहे. मात्र, भाजपाकडून या एकतेला तडा देण्याचं काम सुरू आहे. आगामी निवडणुकांमध्ये फायदा घेण्यासाठी भाजपा या मतभेद निर्माण करत आहे. भारतीय विरुद्ध मुस्लीम आणि भारतीय विरुद्ध काश्मिरी, असा वाद पेटविण्याचं काम भाजपाकडून सुरू आहे. केंद्र सरकारच्या एका समितीच्या आकडेवारीनुसार, मोदी सरकारच्या कार्यकाळात दहशतवादी हल्ल्यांमध्ये 176% वाढ झाली आहे. तर नागरिक आणि सुरक्षा जवानांच्या मृत्युच्या संख्येतही 93% वाढ झाली आहे. सन 2014 ते 2018 या कालावधीत प्रत्येक महिन्याला 11 दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याचं या आकडेवारीवरुन समोर आल्याचं येचुरी यांनी सांगितलं आहे.
तसेच काश्मिरी तरुणांचे दहशतवादी संघटनांकडे वळण्याचे प्रमाणही याच काळात वाढले आहे. सन 2013 मध्ये हे प्रमाण 16 असे होते, पण आता 2018 मध्ये हे प्रमाण 164 पर्यंत पोहोचले आहे. भाजपाकडून जाणीवपूर्वक कट्टर राष्ट्रवादाला खतपाणी घालण्यात येत असून गंभीर मुद्द्यांकडे दुर्लक्ष केलं जात आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळातील सन 2018-19 चा जीडीपी हा 7 टक्के असून गेल्या 5 वर्षातील हा सर्वात कमी जीडीपी असल्याचेही येचुरी यांनी सांगितले.