आज विजय दिवस ! जेव्हा 1971 च्या युद्धात पाकिस्तानने गुडघे टेकत पत्करली होती शरणागती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2017 10:11 AM2017-12-16T10:11:46+5:302017-12-16T10:16:09+5:30
भारतामध्ये आजचा दिवस (16 डिसेंबर) विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. आजच्याच दिवशी 1971 साली भारताने पाकिस्तानवर युद्धात विजय मिळवला होता.
नवी दिल्ली - भारतामध्ये आजचा दिवस (16 डिसेंबर) विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. आजच्याच दिवशी 1971 साली भारताने पाकिस्तानवर युद्धात विजय मिळवला होता. भारत-पाकिस्तानमध्ये लढल्या गेलेल्या दुस-या युद्धात भारतीय सैन्याच्या पराक्रमासमोर पाकिस्तानने अक्षरक्ष: गुडघे टेकत शरणागती पत्करली होती. पाकिस्तानी लष्कराच्या पूर्व कमांडने शरणागतीच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केल्यानंतर हे युद्ध समाप्त झाले. भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या या विजयाला आज 46 वर्ष पुर्ण होत आहेत.
#Delhi: On #VijayDiwas, Defence Minister Nirmala Sitharaman, Army chief Gen Bipin Rawat, Chief of Naval Staff Admiral Sunil Lanba & Chief of Air Staff Air Chief Marshal Birender Singh Dhanoa pay tributes to soldiers who lost their lives in 1971 Indo-Pak war at Amar Jawan Jyoti. pic.twitter.com/AKSzG7QVsa
— ANI (@ANI) December 16, 2017
या युद्धातून एका नव्या देशाची बांगलादेशची निर्मिती झाली. त्यावेळी भारतीय लष्कराच्या पूर्व कमांडचे लेफ्टनंट जनरल जे एस अरोरा प्रमुख होते. शेख मुजीबूर रहमान यांच्या अध्यक्षतेखालील आवामी पक्षाने पूर्व पाकिस्तानात मिळवलेल्या विजयामुळे युद्धाची पार्श्वभूमी तयार झाली. त्यावेळी पश्चिम पाकिस्तानात झुल्फीकार अली भुट्टो यांचा पाकिस्तान पीपल्स पार्टी मोठा पक्ष होता.
#Mumbai: On the occasion of #VijayDiwas, Army officers and jawans pay tributes to soldiers who lost their lives in 1971 Indo-Pak war at Army Garrison Ground in Colaba. pic.twitter.com/7nifcMurpc
— ANI (@ANI) December 16, 2017
पाकिस्तानी लष्कराचे पूर्व पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर अत्याचार सुरु होते. बांगलादेशातून जवळपास 1 कोटी लोक आश्रयासाठी भारतात आले होते. जर असेच सुरु राहिले असते तर भारतात असंतोष वाढला असता, त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना युद्धाचा निर्णय घ्यावा लागला. 3 डिसेंबर रोजी पाकिस्तानी हवाई दलाच्या विमानांनी भारतीय हवाई दलाच्या 11 तळांवर हल्ले केले आणि युद्धाला तोंड फुटलं. भारतीय सैन्याने फक्त 13 दिवसात पाकिस्तानला लोळवून इतिहास रचला. पाकिस्तानचे लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल आमिर अब्दुल्ला खान नियाजी यांनी ढाक्याच्या रेसकोर्स मैदानावर आपल्या 93 हजार सैनिकांसोबत, भारतीय सैन्याचे कमांडर जनरल जगजीत सिंहअरोरा यांच्यासमोर शरणागती पत्कारली होती.
दोन्ही देशांमधील इतिहासातील हे सर्वात छोटे युद्ध ठरले. 90 ते 93 हजार पाकिस्तानी सैनिकांना भारतीय लष्कराने कैद केले होते. या युद्धात भारताच्या तब्बल चार हजार सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. तर दहा हजार सैनिक जखमी झाले होते. याचीच आठवण म्हणून आज देशभर विजय दिवस साजरा केला जातो. विजय दिवसाला दिल्लीतल्या इंडिया गेटवर अमर जवान ज्योतीला सलामी देत युद्धातील शहीदांना श्रद्धांजली वाहिली जाते.