गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांचा दणदणीत विजय, काँग्रेसच्या श्रीमंत उमेदवाराचा केला दारुण पराभव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2017 11:08 AM2017-12-18T11:08:04+5:302017-12-18T11:23:09+5:30
राजकोट पश्चिम विधानसभा मतदारसंघातून गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.
अहमदाबाद - राजकोट पश्चिम विधानसभा मतदारसंघातून गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. रुपानी यांच्याकडे 21 हजारपेक्षा जास्त मतांची आघाडी होती. मतदारसंघ सोडून आलेल्या काँग्रेस उमेदवार इंद्रनील राजगुरु यांचा दणदणीत पराभव झाला आहे. राजकोट पश्चिममध्ये इंद्रनील राजगुरू यांनी रुपानी यांच्यासमोर आव्हान निर्माण केल्याचे मीडियाने रंगवलेले चित्र संपूर्णपणे चुकीचे ठरले आहे.
राजकोट पश्चिम हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. पेशाने व्यावसायिक असलेले इंद्रनील राजगुरु गुजरातमधील श्रीमंत उमेदवार आहेत. इंद्रनील राजगुरु पूर्ण तयारीनिशी ठरवून राजकोट पश्चिमच्या रिंगणात उतरले होते. 1985 सालापासून एकदाही राजकोट पश्चिममधून भाजपाने पराभव पाहिलेला नाही. राजकोट पश्चिममधून निवडणून आलेल्या उमेदवाराने सत्तेच्या राजकारणात नेहमीच महत्वाची भूमिका बजावली आहे.
इंद्रनील राजगुरु यांनी राजकोट पश्चिमची निवड करण्यामागे हे सुद्धा एक कारण होते. वाजूभाई वाला, नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ अशी राजकोट पश्चिमची ओळख आहे. वाजूभाई वाला आता कर्नाटकाचे राज्यपाल आहेत, तर नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान. नरेंद्र मोदी 2001 पासून सातत्याने या मतदारसंघातून निवडून आले. 2014 साली मोदी पंतप्रधान झाल्यावर या जागेवरुन विजय रुपानी यांना संधी मिळाली. त्यावेळी रुपानी 25 हजारपेक्षा जास्त मताधिक्क्याने निवडून आले होते.